भारतात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 7633 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 6,702 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशभरात 61,233 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. INSACOG ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात XBB1.16.1 उप-प्रकारची सुमारे 436 प्रकरणे आढळून आली आहेत. अहवालात असे दिसून आले आहे की आत्तापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणासह 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सबवेरिएंटची ही सर्व प्रकरणे आढळली आहेत. XBB1.16.1 हा Omicron चा एक प्रकार आहे. त्याची पहिली केस जानेवारी 2023 मध्ये आढळून आली.
सोमवारी देशात एकाच दिवसात कोरोनाचे ९,१११ नवे रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 60,313 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 27 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,31,141 वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे सहा, उत्तर प्रदेशात चार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.