कोव्हिड : ओमिक्रॉनला सौम्य म्हणू नये, त्यामुळे अनेकांचे मृत्यू - WHO

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (22:29 IST)
ओमिक्रॉनला 'सौम्य' व्हेरियंट असल्याचं वर्णन करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्कतेचा इशारा दिलाय. जगभरात ओमिक्रॉनमुळे अनेकांचे जीव जातायेत, असं WHO नं म्हटलंय.
कोव्हिडच्या आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्ण फार गंभीर आजारी पडत नाही, असं गेल्या काही दिवसातील अभ्यास सांगतात.
मात्र, ओमिक्रॉनमुळे ज्या संख्येत संसर्ग होतोय, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडताना दिसतोय, अशी चिंता WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी व्यक्त केलीय.
सोमवारी, 3 जानेवारी 2022 रोजी अमेरिकेत 24 तासात 10 लाख कोव्हिड रुग्ण सापडले होते.
गेल्या आठवड्याभरात जगभरात कोव्हिडच्या केसेसमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झालीय. हीच वाढ अमेरिकेत 100 टक्क्यांच्या घरात आहे. कोव्हिड लागण झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के जणांनी लस घेतली नव्हती, असंही स्पष्ट झालंय.
 
"डेल्टा व्हेरियंटच्या तुलनात ओमिक्रॉन व्हेरियंट कमी गंभीर परिणाम दाखवणारा असला, विशेषत: लसीकरण झालेल्यांमध्ये, तरी त्याला 'सौम्य' म्हणायला नको," असं डॉ. टेड्रोस यांनी मंगळवारी, 4 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
"आधीच्या व्हेरियंटप्रमाणेच ओमिक्रॉनमुळेही लोकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागतेय. ओमिक्रॉनही लोकांचे बळी घेतोय. किंबहुना, संसर्गाची लागण एखाद्या त्सुनामीप्रमाणे आहे. जगभरातल्या आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड ताण आणणाऱ्या या केसेस आहेत," असंही ते पुढे म्हणाले.
ओमिक्रॉन सर्वाधिक संसर्ग होणारा आणि पूर्ण लसीकरण झालेल्यांनाही लागण होणारा व्हेरियंट आहे. तरीही कोव्हिडविरोधात लढण्यासाठी आणि रुग्णालयात जाण्यापासून वाचण्यासाठी लसच सध्या एकमेव आधार आहे.
 
2022 मध्ये कोव्हिडवर मात करू, पण त्यासाठी 'या' गोष्टी कराव्या लागतील - WHO
नव्या वर्षात अर्थात 2020मध्ये जर सर्व देशांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एकत्र काम केले तर जगभर पसरलेला कोरोना व्हायरस आपल्याला रोखता येईल, त्याबद्दल आपण आशावादी असल्याचे मत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चे प्रमुख डॉ. टेड्रोस यांनी व्यक्त केले आहे.याच वेळी डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी आपल्या नवीन वर्षाच्या निवेदनात "संकुचित राष्ट्रवाद आणि लशीची साठेबाजी" विरुद्ध इशारा दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी चीन मध्ये सापडलेल्या व्हायरसनंतर डब्ल्यूएचओकडून मार्गदर्शनपर सूचना येत आहेत.
सध्या जगभरातील कोविड केसेसची संख्या 287 दशलक्ष असून आतापर्यंत जवळपास 5.5 दशलक्ष लोक मरण पावले आहेत.
जगभरातील लोक नवीन वर्ष साजरे करत आहेत परंतु यामध्ये उत्साह नाही, अनेक देश एका ठिकाणी गर्दी करण्यापासून नागरिकांना रोखत आहेत.
कोरोनाव्हायरस आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. पण एक व्हायरस ज्याने सीमा बंद केल्या आहेत, परिवार विभाजित केली आहेत. काही ठिकाणी मास्क न वापरता घर सोडणेही अशक्य झाले आहे.
हे सर्व असूनही, डॉ. टेड्रोस यांनी त्यांच्या भाषणात एक सकारात्मक नोंद केली, की सध्या कोरोनाव्हायरस वर उपचारासाठी अनेक लशी उपलब्ध आहेत.
पण त्याचवेळी लस वितरणामध्ये असमानता कायम राहिल्यास विषाणू विकसित होण्याचा धोका वाढत आहे. याकडेही त्यांनी इशारा केला आहे.
"काही देशांद्वारे संकुचित राष्ट्रवाद आणि व्हॅक्सीन होर्डिंगमुळे लस वाटपात असमानता झाली आहे आणि त्यामुळे ओमिक्रॉनच्या उदयासाठी आदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे. जितकी जास्त असमानता चालू राहिल तितकी विषाणूचा प्रसार आपण रोखू शकत नाही किंवा तो किती वाढेल हे सांगू शकत नाही." असे डॉ. टेड्रोस म्हणाले.
ते म्हणाले कि "जर आपण असमानता संपवली तर आपण कोरोना व्हायरस संपवू शकतो,"
 
इतर घडामोडी
दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. तिथे नाईट कर्फ्यू काढून टाकला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये नवीन संक्रमणाचा उच्चांक गाठला आहे.
जर्मन विषाणूशास्त्रज्ञ, ख्रिश्चन ड्रॉस्टेन यांनी ZDF टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि त्यांना तुलनेने सामान्य हिवाळ्याची अपेक्षा आहे. माहितीच्या आधारे त्यांनी ओमिक्रॉनची प्रकरणे तितकी गंभीर नसल्याचे म्हटले आहे.
युके, इटली आणि ग्रीससह अनेक देशांमध्ये कोरोना केसेसचा उच्चांक नोंदवला गेला आहे.
हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्मी संख्या ही यूएस मधील आहे. एअरलाइन्सला कर्मचार्यांना आजाराशी सामना करावा लागत आहे.
फ्रान्समधील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे की इतर व्हेरीयंटच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केसेस आढळत आहेत. तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की पुढील काही आठवडे कठीण असतील, पण येणाऱ्या नव्या वर्षात आम्ही आशावादी आहोत.
कोविड लसीकरणाच्या चौथ्या डोसला मान्यता देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे.
डॉ. टेड्रोस यांनी आपल्या बोलण्यामध्ये कमी लसीकरण दरांचा देखील उल्लेख केला आहे.युरोप आणि अमेरिकेतील बहुतांश लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. पण 2021च्या वर्षाअखेरीस प्रत्येक देशाच्या 40% लोकांना संपूर्ण लसीकरण करण्याचे लक्ष सर्वाधिक आफ्रिकेमध्ये चुकले आहे.डॉ. टेड्रोस यांनी यापूर्वी श्रीमंत राष्ट्रांवर टीका केली आहे की ते जागतिक लस पुरवठ्यावर "घोळ घालत आहेत", श्रीमंत राष्ट्र त्यांच्या बहुतेक लोकसंख्येला पूर्ण लसीकरण करत आहेत पण काही देशांना त्यांच्या पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे.WHO ने 2022 साठी एक नवीन उद्दिष्ट ठेवले आहे: सर्व देशांतील 70% नागरिकांना जुलैपर्यंत लसीकरण करून कोरोना साथीला संपवणे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती