कोरोना व्हायरस : लंडनहून आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, सरकारने जारी केले नवे नियम

मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (16:45 IST)
लंडनहून सोमवारी ((21 डिसेंबर) एअर इंडियाच्या विमानानं भारतात आलेले सहा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
 
तर आजही (22 डिसेंबर ) लंडनहून दुसरा विमान सकाळी 6 वाजता दिल्लीत पोहोचलं आहे. जेनेस्ट्रिंग्स डायग्नॉस्टी सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल यांच्या माहितीनुसार, आज आलेल्याही सर्व प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत.
गौरी अग्रवाल यांनी PTI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "आतापर्यंत 100 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कुणीही पॉझिटिव्ह आढळलं नाही. आज रात्री आणखी दोन विमानं येणार आहेत."
 
त्याचवेळी ब्रिटनहून कोलकात्यात पोहोचलेल्या एका फ्लाईटमध्येही दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत.
222 प्रवाशांना घेऊन हे विमान रविवारी रात्री नेताज सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानताळावर पोहोचलं.
 
पश्चिम बंगालचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "25 प्रवाशांकडे त्यांचा कोरोना टेस्टिंग रिपोर्ट नव्हता. त्यांना जवळील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आणि कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले."
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढलला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जातेय.
 
भारताने या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरदरम्यान ब्रिटनहून भारतात येणारे विमानं रद्द केली आहेत. त्याचसोबत 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर रोजी ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
 
कोरोना व्हायरसच्या नवा स्ट्रेनला घाबरण्याचं कारण नाही - WHO
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोपात चिंतेचं वातावरण आहे. पण या नव्या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे.
 
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
 
इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा गूणसूत्रिय बदल झालेला नवीन विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू कोव्हिड-19 च्या तुलनेत 70 टक्के अधिक वेगाने पसरत असल्याचं ब्रिटनमधील संशोधनात आढळून आलं आहे.
 
केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानं 31 डिसेंबरपर्यंत रद्द केली आहेत. तर, राज्य सरकारने खबरदारीची उपोययोजना म्हणून ब्रिटन, दक्षिण अफ्रिका आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांवर काही निर्बंध घातले आहेत.
 
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
एअरपोर्टवर एका कोपऱ्यातील जागेवर या विमानातील प्रवाशांना उतरण्याची व्यवस्था करावी.
प्रवासी येताना गर्दी होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
दक्षिण अफ्रिका, युरोपातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कस्टम विभागाचे काउंटर निश्चित स्थळी असावेत.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी योग्य उपाययोजना असावी.
विमानातील कर्मचाऱ्यांना एअरपोर्टच्या आत विलगिकरणात (आयसोलेशन) ठेवण्याची व्यवस्था करावी. या कर्मचाऱ्यांना टर्मिनलमध्ये येण्याची परवानगी नाही.
या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्टाफने योग्य काळजी घ्यावी.
ग्राउंड स्टाफने ड्यूटीवर पीपीई किट घालून काम करावं.
नवीन व्हायरसचा धोका असेपर्यंत लोकांची वेळोवेळी तपासणी करावी.
सोशल डिस्टसिंग पाळावं.
या तीन देशातून येणारे प्रवासी, इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
लोकांना एअरपोर्टवरील तपासणी केंद्रात नेऊन त्यांची अधिक माहिती गोळा करावी.
ज्या प्रवाशांना लक्षणं दिसून येतील त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात येईल.
लक्षणं नसलेल्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागेल. हॉटेलचे पैसे प्रवाशांना भरावे लागतील.
14 दिवस झालेल्या प्रवाशांना सोडताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.
प्रवाशांची ने-आण कशी करावी
प्रवाशांना त्यांच्या सामानासकट हॉटेलमध्ये नेण्यात यावं.
प्रवाशांना हॉटेलमध्ये नेण्यासाठी व्यवस्था करावी. यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले कर्मचारी असावेत याची काळजी घ्यावी.
हॉटेलमध्ये दोन प्रवासी एकमेकांना भेटणार नाहीत याची काळजी घेणं सक्तीचं.
एखाद्या प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असेल. तर त्याला नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं समजावं. रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती