विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या. एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दरदेखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता माझे कुटुंब माझी जबाबदारी सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृतीदेखील करण्यात आली.
बूथ करुन लसीकरण करण्यात येणार
राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे.