कोरोना: लॉकडाऊनमध्ये सूट देण्याचा निर्णय नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
बुधवार, 14 जुलै 2021 (20:35 IST)
लॉकडाऊनमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय आज झालेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. कोव्हिडच्या अनुषंगाने मंत्रीमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते.
आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या निर्णयांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 62 करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोव्हिडची पार्श्वभूमीवर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 8 दिवसात डॉक्टरांच्या 899 जागा भरण्यात आल्या. पुढच्या काही दिवसात 1 हजार डॉक्टर भरले जातील, अशी माहिती टोपे यांनी दिली.
मागील एका महिन्यात 7 ते 8 हजारांच्या घरात रुग्ण दररोज वाढतायत. वाढीचा वेग देशाच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील 92 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांत आहेत, उरलेल्या 26 जिल्ह्यात 8 टक्के रुग्ण आहेत, असं टोपे म्हणाले.
दुकाने, रेस्टॉरंटंची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री म्हणाले.
सातत्याने मागण्या होतायत. मला आशा आहे याबाबत मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील. अधिकाधिक लसी मिळवण्याचा प्रयत्न करावा.
"खाजगी रुग्णालयांना उत्पादकांकडून 25 टक्के लस घेता येऊ शकते. तो वाटा आपल्या राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल हा प्रयत्न असेल,"असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, ऑगस्टपर्यंत आपल्याला 4 कोटींपर्यंत लस उपलब्ध व्हायला हवी. सध्या लशींचा पुरवठा कमी आहे.
"शाळा सुरू होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो तो तयार नाही. त्यामुळे शाळा लगेच सुरू होतील अशी सध्या शक्यता दिसत नाही. आपण 10 ते 15 लाख लसीकरण दररोज करू शकतो. मात्र आपल्याला पाच दिवसात 6 ते 7 लाख लशीच मिळतात. पण 18 वर्षं वयावरील विद्यार्थी जिथे आहेत ते सुरू करण्यास हरकत नाही असं माझं मत आहे," असं आरोग्यमंत्री म्हणाले.
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.