कोरोना : मॉडर्ना लशीला भारतात मर्यादित वापरासाठीची परवानगी

मंगळवार, 29 जून 2021 (21:16 IST)
मॉडर्ना या आंतरराष्ट्रीय लशीला भारतामध्ये आणीबाणीच्या काळातल्या मर्यादित वापरासाठीची परवानगी देण्यात आलेली आहे.नीति आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी याविषयीची घोषणा केली.
 
या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील.
 
मॉडर्ना लशीला परवानगी मिळाल्यामुळे आता भारतामध्ये कोव्हिड-19 साठीच्या एकूण 4 लशी उपलब्ध असतील.
 
कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर करत भारतातली लसीकरण मोहीम आधीच सुरू झाली होती. त्यानंतर रशियातल्या गामालयाने तयार केलेल्या स्पुटनिक -व्ही लशीलाही भारतात परवानगी देण्यात आलेली आहे.
 

मॉडर्ना ही देशातली चौथी लस असेल.
 
भारतामध्ये सिप्ला ही औषध उत्पादक कंपनी मॉडर्ना लशींची आयात करणार आहे.
 
अमेरिका किंवा इतर देशांमध्ये चाचण्या केलेल्या ज्या लशींना तिथे मान्यता देण्यात आलेली आहे, अशा लशींना भारतातल्या वापरासाठीची परवानगी देताना भारतात वेगळ्याने चाचण्या करणं गरजेचं ठेवणार नसल्याचं भारत सरकारने म्हटलं होतं.
 

मॉडर्ना लशीला त्यानुसारच मर्यादित वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे.
 
ही लस देण्यात येणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींविषयीची माहिती औषध नियामकांकडे सादर करावी लागेल आणि त्यानंतरच या लशीला मोठ्या प्रमाणावरच्या वापरासाठीची परवानगी मिळेल.
 
कोव्हिड -19 रोखण्यामध्ये मॉडर्ना लस 90% परिणाामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं होतं. ही एक mRNA प्रकारची लस आहे. म्हणजे ही लस कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचा एक भाग शरीरात इंजेक्ट करते.
 
हा भाग व्हायरल प्रोटीन्स तयार करायला सुरूवात करतो, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला विषाणू संसर्गाविरुद्ध प्रशिक्षित करण्यासाठी पुरेसे असतात.
 
अमेरिकेमध्ये डिसेंबर 2020 मध्ये या लशीला परवानगी देण्यात आली.
 
अमेरिकेसह अनेक इतर देशांनी या मॉडर्नाच्या लशीच्या चाचण्या सुरू असतानाच डोसेसची ऑडर्र दिलेली होती.
 
मॉडर्नाच्या लशीचं बहुतांश उत्पादन केंब्रिज आणि मॅसेच्युसेट्समध्ये होतंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती