जगातील कोरोनाग्रस्तांचा यादीत ब्राझील देश दुसऱ्या स्थानावर आहे. आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती एएफपी या न्यूज एजेंसीने दिली आहे. ब्राझील राष्ट्रध्यक्षांनी स्वतः याबाबत मंगळवारी सांगितले. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र ते पूर्णपणे ठीक असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ब्राझीलमध्ये १६ लाख ४३ हजार ५३९ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून यापैकी ६६ हजार ९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १० लाख ७२ हजार २२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या ५ लाख ५ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे.