औरंगाबाद येथील वाळूंज एमआयडीसीत बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील कंपनी अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी कंपनी बंद ठेवण्यास सांगितले आहे.
औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.