नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिट वे’

मंगळवार, 21 एप्रिल 2020 (08:06 IST)
जिल्ह्यातील दुसरा तर महानगर पालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त
 
जिल्ह्यातील दुसऱ्या तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या रुग्णाच्या दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्याला दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा देवून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले, हे आरोग्य यंत्रणेचे यश पाहता प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त होवून नाशिक कोरोनाचे ‘एक्झिट वे’ ठरेल, असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केला.
 
गोविंद नगर येथील हा रुग्ण दिल्ली येथे जावून आला असल्याने ४ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्त्रावाची चाचणी केल्यानंतर ६ एप्रिल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा महानगर पालिकाक्षेत्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करुन त्याला कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झाले असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले.
 
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी खूप परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, नाशिक शहरासह मालेगाव येथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रुग्णही या रुग्णाप्रमाणेच लवकर बरे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये गेला असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून कुठल्याही व्यक्तीला रुग्णालयात येण्याची वेळ येवू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी यावेळी केले.
 
माझ्या आनंदाचे श्रेय आरोग्य यंत्रणेला:
कोरोना आढळून आला तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासारखे युध्द जिंकू शकलो आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांना व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही कोरोनामुक्त रुग्णाने यावेळी नागरिकांना केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती