Death of a corona patient अनेक महिन्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (07:28 IST)
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांनंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, परंतु आता अधिकृत नोंदींमध्ये त्याचा आता समावेश करण्यात आला आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
मृत व्यक्ती ७५ वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरल त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान, मुंबईत १० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण संसर्ग संख्या ११,६४,१०८ वर पोहोचली. तर ताज्या मृत्यूने एकूण मृत्यूची संख्या १९,७७६ वर नेली. ऑगस्ट महिन्यामधील ही दुसरी वेळ आहे की शहरात कोविड प्रकरणे दुहेरी अंकात नोंदली गेली आहेत; यापूर्वीची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली होती.
 
रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाही. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्या ११,४४,२८५ झाली आहे. सध्या मुंबईत ४७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत एकूण २९२ चाचण्या घेण्यात आल्या, त्यामुळे एकूण चाचणी संख्या १,८९,१७,९५१ झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती