विधिमंडळातील दोन आमदारांसह ४० बाधित

सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (12:26 IST)
पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके  मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे  दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह ४० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
 
दोन दिवसीय अधिवेशनात हजर राहणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार, सुरक्षा कर्मचारी साऱ्यांनाच करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. यानुसार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, दोन आमदारांसह ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. काही सदस्यांना गॅलरीत बसवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन संबंधित पक्षांच्या प्रतोदांकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
 
२२०० जणांच्या चाचण्या
गेल्या दोन दिवसांत उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य मंत्री, आमदार अशा एकूण २२०० जणांनी विधिमंडळ परिसरात करोना चाचणी के ली. तसेच मुंबईबाहेरील किती आमदारांनी आपले करोना अहवाल विधिमंडळाला पाठविले हे स्पष्ट झालेले नाही. किती आमदार सोमवारी अधिवेशनाला हजेरी लावतात, याकडेही लक्ष लागले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती