सरकार तरणे महत्‍वाचे नाही देशाची प्रतिष्‍ठा महत्‍वाची

आज देशासमोर गरीबी आणि उर्जा या दोन महत्‍वाच्‍या समस्‍या आहेत, त्‍या सोडविण्‍यासाठी काय करता येईल त्‍यादृष्‍टीने विचार करण्‍यासाठीच आपल्‍याला जनतेने निवडून दिले आहे. आपण सर्वजण मिळवून त्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करूया. आज या सभागृहात काय घडेल, सरकार राहील की जाईल हे महत्‍वाचे नाही आपण येणा-या पिढीला कोणता वारसा देणार आहोत हे महत्‍वाचे आहे. अणू कराराच्‍या माध्‍यमातून महासत्‍ता बनण्‍यासाठीची एक चांगली संधी चालून आली आहे, तिचा लाभ घ्‍या, असे भा‍वनिक आवाहन खा.राहुल गांधी यांनी सभागृहाला केले.

राहुल गांधी सरकारची बाजू मांडण्‍यासाठी उभे राहिल्‍यानंतर बराच वेळ संसदेत बसपा खासदारांनी गोंधळाचे वातावरण निर्माण केल्‍याने सभापती सोनाथ चॅटर्जी यांनी सभागृहाचे कामकाज काहीवेळासाठी तहकुब केले. कामकाजास सुरूवात झाल्‍यानंतर देशातील गरीबी आणि उपासमारीकडे लक्ष वेधत त्‍यांनी विदर्भाच्‍या दौ-याचा संदर्भ देत देशातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येकडे व खालावलेल्‍या परिस्थितीकडे लक्ष वेधले.

सदस्‍यांना भावनिक आवाहन करून त्‍यांनी सांगितले, की देश आज गरीबीचा सामना करत असताना आपण सर्वांना ती घालविण्‍यासाठी एकत्र येउन प्रयत्‍न करायचे आहेत. सत्‍ताधारी असोत की विरोधक मला वाटते आपल्‍याला सर्वांनाच देश महासत्‍ता झालेला पहायचे आहे. अणू करार हा देशाचा भविष्‍यकालीन विमा आहे. आगामी काळात उर्जेचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवणार आहे. त्‍यावेळी न्‍युक्‍लीअर, हायड्रोलीक आणि सोलर या अपारंपरिक उर्जाच आपल्‍याला वाचवू शकतील. आगामी 30 वर्षात जगात चीन व भारत या दोन महासत्‍तांना या उर्जेची मोठया प्रमाणावर आवश्‍यकता भासणार आहे, अशा वेळी आपण ती कुणाकडे मागणार. करार ही आपल्‍यासाठी एक संधी आहे. जागतिक उर्जास्‍त्रोतांना आपल्‍याकडे वळविण्‍याची ही एक संधी आहे. काही वर्षांपूर्वी आयटी आणि टेलीकम्‍युनिकेशन क्षेत्रासही अनेकांचा विरोध होता. आज ती आपली गरज झाली आहे. गरीबीवर मात करण्‍यासाठी त्‍याचा मोठा वापर होउ शकणार आहे, असेही त्‍यांनी ठासून सांगितले.

वाजपेयी सरकारने गरीबीसाठी केलेल्‍या प्रयत्‍नांचीही त्‍यांनी स्‍तुती केली. सरकार तरेल की नाही हे महत्‍वाचे नाही जगात आपली प्रतिष्‍ठा किती वाढेल हे महत्‍वाचे आहे. अनेक सरकारे येतील आणि जातील परंतु ही संधी पुन्‍हा येणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवा. सर्वांनी एकत्र येउन महासत्‍ता देश घडवूया असे आवाहनही त्‍यांनी केले.

वेबदुनिया वर वाचा