की रत्नांमजी हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा
भाषा मराठी
फादर स्टिफन्स या पोर्तुगीज माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.
सव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी!) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.
त्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार? ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.
या घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.
खरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.
तिच्या अभ्यासात येणार्या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.
एका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.
तिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.
पण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल? दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.