Shivrajyabhishek Sohala डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा!

गुरूवार, 6 जून 2024 (09:37 IST)
दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवप्रेंमीचा उत्साह दिसून येत आहे. 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
 
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त सध्या रायगडावर दाखल झालेत. तर मग जाणून घेऊ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याबद्दल
 
रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा!  प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो. 6 जून 1674 रोजी इतिहासाने हा सुवर्णक्षण रायगडी अनुभवला.
 
शिवराज्याभिषेक दिन सोहळा -  
मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे पाहिले जाते. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या बहुतांश भागात मुस्लीम सत्तांचे वर्चस्व असताना त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करून शिवाजी महाराजांनी शुन्यातूनच नविन स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेकामुळे मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाली. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे जे असामान्य कार्य केले होते त्याची परिणती शिवराज्याभिषेक सोहळयामध्ये होणे अटळ होते. मुघल, आदिलशहा व कुतुबशहा या राजवटीत चाकरी करून अनेक मराठा सरदार स्वत:ला राजे म्हणवून घेत असत. पण त्यांना स्वतः ला विधीयुक्त राज्याभिषेक मात्र करता येत नसे. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशहा व कुतूबशहा यांना आपण स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीश झाल्याचे दाखवून दिले. हिंदू जनतेसाठी एक स्वतंत्र राज्य व राजा आहे याची जाणीव करून दिली.
शिवराज्याभिषेक करण्याचा विचार नेमका कोणाचा होता ?
 
शिवराज्याभिषेक करण्याचा विचार नेमका कोणाचा होता व हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात केव्हा आला याविषयी विविध मते व्यक्त केली जातात.  गागाभट्टाच्या आग्रहामुळे मराठा साम्राज्याच्या छोटया बखरीमध्ये सर्वांचा मनोदय झाला तर चिटणीस बखरीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निश्चय केला असे म्हटले आहे.  "वेदमूर्ति राजेश्री गागाभट म्हणून वाराणशीहून राजियाची किर्ती ऐकून दर्शनास आले... त्यांचे मते, मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात, आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा लकर गडकोट असे (मेळविले) असता त्यास तक्त नाही. याकरिता महाठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणिले. आणि (ते) राजियासहि मानले" राज्याभिषेक करण्याचा विचार स्वतः शिवाजी महाराजांचाच असला पाहिजे. त्यांच्या या कल्पनेस त्यांच्या सहकान्यांचाही पाठिंबा असला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वकांक्षी मनोवृत्तीच्या जिजाबाईंचीही प्रेरणा राज्याभिषेकाबाबत असली पाहिजे. त्यांनी राज्याभिषेक केला नसता तर अनेक संकटावर मात करून मोठ्या कष्टाने व जिद्दीने निर्माण केलेल्या स्वराज्यास अर्थच राहिला नसता. विधियुक्त राज्याभिषेक केल्यामुळे स्वराज्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर व सार्वभौम स्वरूप प्राप्त झाले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यास प्रामुख्याने पुढील कारणे कारणीभूत ठरली.
 
शिवराज्याभिषेक सोहळा - Coronation ceremony of Shiva
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुरोगामी विचारसरणीचा विद्वान पंडित गागाभट्ट याच्याकडून करण्याचे निश्चित झाले होते. शिवराज्याभिषेक घटनाक्रम खालील प्रमाणे आहे.
 
30 मे 1674 : (शनिवार) - शिवाजी महाराजांचे मौजीबंधन झाल्यामुळे शास्त्रानुसार राण्यांशी पुन्हा विवाह होणे आवश्यक होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले. या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले. वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पध्दतीप्रमाणे राज्याभिषेकविधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली. "
 
31 मे 1674 : (रविवार) - रविवारी ऐन्द्रीशांतीच्या कार्यास प्रारंभ झाला. अग्नीप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा, चतुष्कभस्थापन, ऐशानयाग इ. विधी पार पाडण्यात आले. आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
 
1 जून 1674 (सोमवार) -  ग्रहयज्ञ व त्यानंतर नक्षत्रहोम हे विधी करण्यात आले.
2 जून 1674 (मंगळवार) -  मंगळवार व नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास निषिध्द असल्यामुळे या दिवशी कोणताही विधी करण्यात आला नाही..
3 जून 1674 (बुधवार) -  नक्षत्रयज्ञ करण्यात आला.
4 जून 1674 (गुरूवार) -  या दिवशी रात्री निर्ऋतियाग हा यज्ञ पार पडला. मांस, मत्स्य व मंदिरा यांची याप्रसंगी आहुती देण्यात आली. यागानंतर स्नान करून पुण्याहवाचन करण्यात आले.
5 जून 1674 (शुक्रवार)  -  हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. ब्राम्हणभोजन आणि ऐन्द्रीशांतीच्या मुख्य कार्यांची समाप्ती करण्यात आली. राज्याभिषेकाचा मुहूर्तं त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी सुरू होता.
 
राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दि. 5 जून रोजी सायंकाळपासून सुरूवात होऊन तो शनिवार दि. 6 जून रोजी सकाळी पूर्ण झाला.
 
शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आणि स्वराज्याचे स्वप्न खन्या अर्थाने साकार झाले. रायगड किल्यांवरून तोफांची सलामी देण्यात आली. मंगलवाद्यांच्या जल्लोषामुळे स्वराज्यातील वातावरण मंगलमय झाले. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर रायगड किल्याबरोबरच संपूर्ण स्वराज्यात आनंदाचे उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. राज्याभिषेकाचे वर्णन करताना सभासद म्हणतो, "सर्वास नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राम्हणांनी स्थळीस्थळीची उदके करून सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले कित्येक नवरत्नादिक सुवर्णकमळे व नाना सुवर्णफुले, वस्त्रे उघड दिधली दानपध्दतीप्रमाणे षोडश महादाने इत्यादिक दाने केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी  अष्टप्रधान यांनी उभे राहावे. पूर्वी कृतायुग, त्रेतायुग, द्वापारी कलयुगाचे ठायी पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले" शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन सभासद बखरीप्रमाणेच चिटणीस बखर व हेन्री ऑक्डिांडेनच्या रोजनिशीमध्येही केले आहे.
 
शिवराज्याभिषेकाचे महत्व
मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पाहिले जाते.
 
" 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची स्थापना केली. शिवराज्याभिषेकाचे महत्व स्पष्ट करताना वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "शिवाजी महाराजांच्या ज्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक व पारमार्थिक संस्कृतिची मूल्ये खोलवर रूजली गेली, याच महाराष्ट्राच्या हत्पटलावर राज्यसंस्थेच्या उत्कान्त, संस्कृतिचे प्रतिबिंब चिरंजीव करण्याचे कार्य या शिवराज्याभिषेकविधीत आहे. कारण त्या घटनेने राज्यव्यवहारात अखिल समाजाला समानतेच्या पातळीवर आणले व धार्मिक व्यावहारिक पारतंत्र्याला आळा घालण्याचे एक तंत्र निर्माण झाले... राज्याभिषेकाचे महत्व सांगताना सेतुमाधराव पगडी म्हणतात, "परकी आणि असहिष्णू सत्तेविरूध्द भारतीय जनतेचा क्षोभ उसळून आला. त्याचे प्रतिक म्हणजे एतद्देशीय अशा स्वतंत्र राज्याची स्थापना हे होय... घटनेने भारतीय अस्मिता जागृत झाली आणि अठराव्या शतकात मोगल साम्राज्य कोसळून पडले. "
 
1. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून मराठयांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापन केल्यामुळे चारशे वर्षापेक्षा अधिक काळ गुलामगिरीत खीतपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाली.
2. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने नमुद करण्याची है। हाती. शिवराज्याभिषेकामुळे एका नव्या युगाची सुरूवात झाली. मुस्लीम राजवटीच्या वर्चस्वाखाली सर्वस्व हरवून बसलेल्या समाजामध्ये स्वातंत्र्याची स्वाभिमानाची व पराक्रमाची भावना निर्माण करण्याचे कार्य राज्याभिषेकाने केले.
3. शिवराज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजपदाला कायद्याची मान्यता मिळाली.  १६४५ पासून सुरू केलेले स्वराज्य स्थापनेचे कार्य खन्या अर्थाने सार्थकी लागले.
4. राज्याभिषेकामुळे हिंदूना स्वतंत्र राजा मिळाला. त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना नाहिशी झाली. मुस्लीम राजवटींशी संघर्ष करून मराठे स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतात हे शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तत्वातून दाखवून दिले.
5. पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय नाही त्यामुळे कोणी राजा बनू शकत नाही या विचाराला खन्या अर्थाने मुठमाती मिळाली.
6. राज्याभिषेकामुळे विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदूंना स्वतंत्र राजा मिळाला. मराठ्यांच्या पराभूत मनोवृत्तीला राज्याभिषेकामुळे नवसंजीवनी प्राप्त झाली. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या गुलामगिरीच्या शृंखला राज्याभिषेकामुळे गळून पडल्या.
7. राज्याभिषेकामुळे न्यायदानाच्या संदर्भातील शिवाजी महाराजांची अडचण दूर झाली.. राज्याभिषेकामुळे ब्राम्हण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना मिळाला.
8. संस्कृत भाषेचा सर्वत्र वापर करण्यावर भर देऊन फारशी भाषेचे महत्व कमी झाले.. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सहयाद्रीच्या कुशीत लावलेले स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता भारताच्या बहुतांश भागात पसरत गेले.
 
Edited by : Ratnadeep Ranshoo

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती