(छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्यांची औरंगजेबाच्या ताब्यातून आग्र्याहून झालेली सुटका. या घटनेवर अमोल कोल्हे हे 'शिवप्रताप-गरुडझेप' हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यानिमित्ताने या घटनेची चर्चा होत आहे.)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत.
बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका.
शिवाजी महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंहांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र ते तितकं सोपं नव्हतं.
मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारासमोर जाणं आपल्याला बाध्य नाही असं पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलं होतं.
त्याला तशी कारणंही होती.
औरंगजेबाच्या शब्दांवर शिवाजी महाराजांचा आजिबात विश्वास नव्हता. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी औरंगजेब कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं.
'शिवाजी अँड हिज टाइम्स' या पुस्तकात इतिहास अभ्यासक जदुनाथ सरकार लिहितात, "जयसिंहांनी शिवाजी महाराजांना एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे कदाचित औरंगजेबाच्या भेटीनंतर बादशहा शिवाजी महाराजांना आपला दख्खनचा प्रतिनिधी बनवेल. तसेच विजापूर आणि गोवळकोंड्यावर कब्जा करण्यासाठी महाराजांच्या नेतृत्वाखाली फौज पाठवली जाऊ शकते. वास्तविक औरंगजेबानं अशा कोणत्याही प्रकारचा शब्द दिलेला नव्हता."
औरंगजेबाचं पत्र
औरंगजेबाच्या भेटीनंतर विजापूरकडून चौथाई वसूल करण्याची शाही परवानगी मिळेल असं शिवाजी महाराजांना वाटत होतं.
या विषयावर महाराजांच्या दरबारात चर्चा झाल्यावर त्यांनी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेलं पाहिजे, असं ठरवण्यात आलं.
शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्रं सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी 5 मार्च 1666 रोजी निघाले.
जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली होती.
आग्र्याच्या प्रवासाचा खर्च म्हणून 1 लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती.
वाटेत असताना महाराजांना औरंगजेबाचं एक पत्र मिळालं.
प्रसिद्ध इतिहासलेखक सेतूमाधवराव पगडी यांनी आपल्या 'छत्रपती शिवाजी' या पुस्तकात लिहिलंय, "या पत्राचा आशय असा होता की, आपण इथे कोणत्याही संकोचाविना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये. मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिलं जाईल. तुमच्या सेवेसाठी खिलत (शाही पोशाख)सुद्धा पाठवत आहे."
औरंगजेबाची भेट आणि त्याचं वागणं
9 मे 1666 रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोहोचले होते. त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरलेला होता.
12 मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली.
दरबारात 'शिवाजी राजा' असे शब्द पुकारण्यात आल्यावर, कुमार रामसिंहांनी शिवाजी महाराज, युवराज संभाजी राजे आणि दहा सेवकांना घेऊन दिवाण-ए-आममध्ये औरंगजेबासमोर आणले.
महाराजांतर्फे औरंगजेबाला 2000 सुवर्ण मोहरा नजर करण्यात आल्या तसेच 6000 रुपये निसार म्हणून देण्यात आल्या.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन तीनवेळा मुजरा (कुनिर्सात) केला.
त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली. औरंगजेबानं मान हलवून शिवाजी महाराजांच्या भेटी स्वीकारल्या.
त्यानंतर औरंगजेबानं आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं.
ते महाराजांना तिसऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठरवलेल्या जागेवर घेऊन गेले.
दरबार पुढे ठरवल्यानुसार सुरू झाला. शिवाजी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती.
शिवाजी महाराजांचा रागाचा पारा चढला
जदुनाथ सरकार लिहितात, "आग्र्याबाहेर आपल्या स्वागतासाठी राम सिंह आणि मुखलिस खानासारखे साधे अधिकारी पाठवल्याचं शिवाजी महाराजांना आवडलं नव्हतं."
दरबारात मान तुकवली तरीही शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नाहीत किंवा त्यांना नजराणाही दिला गेला नाही. त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगांनंतर मागे उभं करण्यात आलं, तिथून औरंगजेब दिसतही नव्हता.
तोपर्यंत शिवाजी महाराजाच्या रागाचा पारा चढलेला होता. त्यांनी आपल्याला कोणत्या लोकांमध्ये उभं केलंय? असं राम सिंहाला विचारलं.
तुम्ही पाच हजारी मन्सबदारांमध्ये उभे आहात असं राम सिंहांनी त्यांना सांगताच ते ओरडले, "माझा सात वर्षांचा मुलगा आणि माझे नोकर नेताजीही पाच हजारी आहेत. बादशहाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मला ही वागणूक देण्यात येतेय"
त्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं, "माझ्यासोर कोण उभे आहेत?"
जेव्हा राम सिंहांनी सांगितलं की ते राजा राय सिंह सिसोदिया आहेत. तेव्हा शिवाजी महाराज चिडून म्हणाले, राय सिंह हे जयसिंहांचे लहानसे कर्मचारी आहेत. मला त्यांच्या रांगेत का ठेवलंय?"
संतापाचा कडेलोट
औरंगजेबाच्या कारकिर्दीतील पहिल्या 10 वर्षांच्या प्रशासनावर लिहिण्यात आलेल्या 'आलमगीरनामा' पुस्तकात मोहम्मद काझिम लिहितात, "अपमानामुळे क्रोधित झालेले शिवाजी महाराज रामसिंहाशी मोठ्याने बोलू लागले, दरबारचा नियम मोडू नये म्हणून रामसिंह शिवाजी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश आलं नाही."
थोडावेळ उभं राहिल्यावर शिवाजी महाराज तिथून बाहेर पडून एका बाजूला कोपऱ्यात बसून राहिले.
शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे? असं औरंगजेबानं विचारलं.
त्यावर राम सिंहांनी एकदम कूटनितीपूर्ण उत्तर दिलं, "जंगलातला वाघ आहे. इथला उन्हाळा त्याला सहन होत नाहीये आणि तो आजारी पडलाय."
त्यांनी औरंगजेब बादशहाची माफी मागत दख्खनवरून आलेल्या या राजास शाही दरबाराचे नियम-कायदे माहिती नाहीत, असं रामसिंह म्हणाले.
त्यावर औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितलं. तिथं त्यांच्यावर गुलाबपाण्याचा शिडकावा करावा. ते बरे झाल्यावर दरबार संपण्याची वाट न पाहाता त्यांना थेट निवासस्थळी पोहोचवावं, असं सांगितलं.
शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाला मुघल सैनिकांचा वेढा
शिवाजी महाराजांना आग्रा शहराच्या बाहेर जयपूर सराईत ठेवावं असा राम सिंहांना हुकुम देण्यात आला. शिवाजी महाराज जयपूर निवासात पोहोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीने त्या घराला घेरलं, थोड्याच वेळात पायदळातले सैनिकही तिथं आले. त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोंड दाराच्या दिशेने केलं.
असेच काही दिवस गेले, शिवाजी महाराजांची हे सैनिक निमूट निगराणी करत आहेत हे पाहिल्यावर, औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना मारण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट झालं.
डेनिस किंकेड आपल्या शिवाजी 'द ग्रेट रिबे' पुस्तकात लिहितात, "शिवाजी महाराजांना भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती, मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला."
त्याने महाराजांसाठी फळांच्या करंड्या पाठवल्या. बादशहा आपल्याला सुरक्षितपणे परत पाठवणार होता याची आठवण करुन देणारा संदेश महाराजांनी प्रमुख वझीर उमदाउल मुल्क यांना पाठवला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
औरंगजेब आपल्याला डिवचू पाहातोय जेणेकरुन आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचं कारण बादशहाला मिळेल याची शिवाजी महाराजांना हळूहळू जाणीव झाली.
शिवाजी महाराजांचं वर्तन अचानक बदललं
शिवाजी महाराजांचं वागणं अचानक बदललं आहे हे सैनिकांच्या लक्षात आलं. ते एकदम आनंदी दिसू लागले.
पहाऱ्यावरच्या सैनिकांशी ते हसू-बोलू लागले. सैन्याधिकाऱ्यांना त्यांनी अनेक भेटी पाठवल्या आणि आग्र्याचं हवामान आता बरं वाटतंय असंही ते बोलू लागले.
बादशहा आपल्याला फळं-मिठाया पाठवतोय यामुळे आपण त्याचे ऋणी आहोत. राज्यकारभाराच्या धबडग्यापासून दूर आग्र्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मजा येतेय असं ते सांगू लागले.
याच काळात औरंगजेबाचे हेर त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवून होते. शिवाजीराजे फारच आनंदी दिसत असल्याचं त्यांनी बादशहाला कळवलं.
डेनिस किंकेड लिहितात, "औरंगजेबाला आणखी आश्वस्त करण्यासाठी महाराजांनी आणखी एक मागणी संदेशाद्वारे केली. आपल्याजवळ आपली पत्नी आणि आई येऊन राहू शकते का असं त्यांनी विचारलं. त्याला औरंगजेबानं परवानगी दिली. आपल्या घरातील महिलांना कैदेत ठेवून पळून जाण्याचा विचार कोणी करणार नाही असा विचार त्याने केला. अर्थात शाही परवानगी मिळूनही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील स्त्रिया तेथे आल्याच नाहीत."
पावसामुळे त्या एवढा लांबचा प्रवास करू शकत नाहीयेत असं कारण देण्यात आलं.
काही दिवसांनी आपल्या घोडेस्वारांना परत जाण्याची परवानगी मिळावी असं त्यांनी कळवलं. बादशहाला स्वतःच या लोकांपासून सुटका करुन घ्यायची होती त्यामुळे महाराजांची मागणी ऐकून बादशहा आनंदी झाला.
फळांच्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं. मुघल पहारेकऱ्यांना त्यांच्या कण्हण्याचा आवाजही येऊ लागला. बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी निवासस्थानाबाहेर ब्राह्मण आणि साधूंना मिठाया आणि फळं पाठवू लागले.
काही दिवस पहारेकरी सैनिकांनी त्याची तपासणी केली मात्र नंतर त्याकडं लक्ष देणं थांबवलं.
जदुनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड हिज टाइम्स पुस्तकात लिहितात, "19 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला. आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत. आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं."
दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं.
शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही.
हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले. तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहात होते.
औरंगजेबाचा तीळपापड
सेतूमाधवराव पगडी छत्रपती शिवाजी पुस्तकात लिहितात, "शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहित धरून चालता येणार नाही. पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असहाय्य होणारे ते नव्हते. त्यांचे 9 वर्षांचे पुत्र संभाजी राजे नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील पण शिवाजी महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावेत."
हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले. सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं.
तीन वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले. 'महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, गोंधळ करू नका' असं त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं.
थोड्यावेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाहीये, हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली. त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलाद खानला सांगितली. अवसान गेलेला फलाद खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला.
त्याच्या तोंडून शब्द आले.. "जादू.. जादू... शिवाजी गायब झाले आहेत. ते हवेत गायब झाले किंवा धरणीनं त्यांना गिळलं असावं...मला काहीच माहिती नाहीये...."
हे ऐकताच औरंगजेब हैराण झाला. त्यानं दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि बराच वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला. शिवाजी महाराजांच्या शोधासाठी त्यानं चारही दिशांना सैनिक पाठवले पण ते सर्व रिकाम्या हातांनी परतले.
संन्याशाच्या वेशात जिजाबाईंसमोर
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीने बरोबर उलट रस्ता निवडला.
वायव्येस माळवा-खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला.
मथुरा, अलाहाबाद, बनारस, पुरी अशा मार्गाने ते गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करुन राजगडावर आले.
औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडल्यावर ते सहा तासांच्या आत मथुरेला पोहोचले. तिथं त्यांनी केस, दाढी, मिशी यांचा त्याग केला. संन्यासाचा वेश घेऊन भगवी कफनी घातली.
डिसेंबर महिन्याच जिजाबाई आपल्या खोलीत बसलेल्या असता एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला. त्यांनी त्या संन्याशाला आत पाठवण्यास सांगितले.
आत येताच तो संन्यासी जिजाबाईंच्या पायावर पडला. त्यांनी विचारलं बैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागले? जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला वर उठवलं आणि त्यांची नजर त्याच्या चेहऱ्यावर गेली. तेव्हा जिजाबाई जोरात ओरडल्या... शिवबा!!!