बीएमएस, बीसीए, बीबीएच्या दुकानदारीला लागणार लगाम , कारण ........

गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (22:05 IST)
मुंबई : कला-वाणिज्य-विज्ञान शाखांतर्गत येणाऱ्या पारंपरिक महाविद्यालयांमधील बीएमएस, बीसीए, बीबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना आता ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय नियमन संस्थेने आपल्या छत्राखाली घ्यायचे ठरविले आहे.
 
या अभ्यासक्रमांना सध्यातरी एआयसीटीईच्या निकष, शुल्करचना, प्रवेशाच्या कठोर नियमांमधून सवलत देण्यात आली आहे, परंतु गुणवत्ता, शुल्क यांबाबत कुणाचेच फारसे नियंत्रण नसलेल्या या महाविद्यालयांच्या मुसक्या भविष्यात मान्यतेच्या नावाखाली एआयसीटीईकडून आवळल्या जाणार आहेत. साधारण २२ वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या काळात बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडिज (बीएमएस), बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) यांच्यासह बॅचलर इन मास मीडिया (बीएमएम), बीएस्सी आयटी अशा भाराभर विनाअनुदानित तत्त्वावरील अभ्यासक्रमांना कला-विज्ञान-वाणिज्य या शाखांतर्गत मान्यता देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.
 
विद्यार्थ्यांना पारंपरिक महाविद्यालयांमध्ये संगणक, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे धडे गिरवता येतील आणि त्यांना नोकरीधंदा मिळविणे सोपे जाईल, अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आली. त्यानंतर, राज्यभर सर्वच विद्यापीठ संलग्न पारंपरिक महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवू लागले.
 
या अभ्यासक्रमांची गुणवत्ता, निकष, सोईसुविधा, शुल्क यावर कुणाचेच नियंत्रण नाही. बहुतांश कारभार कंत्राटी वा अभ्यागत शिक्षकांवर चालतो. तुलनेत शुल्क मात्र अव्वाच्या सव्वा. या अभ्यासक्रमांच्या आडून कॉलेजांना पैसे कमावण्याचा राजमार्ग सापडला होता. आता यापैकी तंत्रशिक्षण म्हणजे व्यवस्थापन, संगणकविषयक अभ्यासक्रमांना एआयसीटीईने आपल्या छत्राखाली आणण्याचे ठरविल्याने महाविद्यालयांची अडचण होणार आहे.
 
सध्या तरी या महाविद्यालयांची संलग्नता, शैक्षणिक-प्रशासकीय व्यवस्था, परीक्षा, प्रवेश यांत कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका एआयसीटीईने घेतली आहे. मात्र, संस्थांना त्यांच्याकडील अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, शिक्षकांची उपलब्धता, सुविधा, शुल्क यांची माहिती देऊन मान्यता घेणे, बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती सुरुवातीला तरी जुजबी स्वरूपाची असेल. मात्र, भविष्यात एआयसीटीई या अभ्यासक्रमांकरिता ठरवून देणाऱ्या निकषांची महाविद्यालयांना पूर्तता करावी लागणार आहे. या बदल्यात एआयसीईटीची शिष्यवृत्ती, संशोधन, ई-अभ्याससाहित्य, प्लेसमेंट पोर्टल, इंरटर्नशीप योजना यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 
नवा अभ्यासक्रम एआयसीटीई तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकरिता राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून मॉडेल अभ्यासक्रम तयार करत आहे. असा अभ्यासक्रम ‘बीएमएस’, ‘बीसीए’, ‘बीबीए’साठीही तयार केला जाणार आहे. मान्यता कुणाची  ‘बीएमएस’, ‘बीसीए’, ‘बीबीए’सह बीएमएम, बीएस्सी-आयटी आदी अभ्यासक्रमांना राज्य सरकार मान्यता देते. विद्यापीठे आपल्या बृहद् आराखडा तयार करून हे अभ्यासक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवितात.  या प्रस्तावांची छाननी करून, राज्याचे मंत्रिमंडळ त्यांना मान्यता देते. आता या अभ्यासक्रमांना अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांप्रमाणे एआयसीटीईची परवानगी घ्यावी लागेल.
 
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना एकाच छत्राखाली आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या विद्यापीठाकडे नियमन असलेल्या या अभ्यासक्रमांना एकाच शिखर संस्थेखाली आणणे गरजेचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती