ट्विटरवर फुटला अर्थसंकल्प : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

बुधवार, 19 जून 2019 (12:35 IST)
विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्याचवेळी अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहिर होत असल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा समजून घेण्याचा हा सभागृहाचा आणि आमदारांचा अधिकार आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री व मुनगंटीवार यांनी सभागृहाची माफी मागावी, अन्यथा अर्थमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, ‘विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मी तपासून पाहिले. ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात १५ मिनिटांचे अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त २ ते ३ मिनिटांचे अंतर असते. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ‘डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतं. विरोधी पक्षांनी ही माध्यमे समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात, पण आम्ही सकारात्मक वापर करत आहेत यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये’, असेही म्हटले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती