शेअर बाजारात सातत्याने चाललेले उतार- चढाव, शेतकर्यांच्या आत्महत्यां प्रकरणी विरोधी पक्षांनी माजवलेले रान, सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार्या डाव्यांनी सरकारची केलेली कोंडी, देशातील वाढती महागाई आणि आगामी काळात देशात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्थमंत्री पी चिदंबरम आपला पाचवा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
रेल्वे अर्थसंकल्पात सामान्यांना रेल्वे मंत्र्यांनी भरभरून दिल्यानंतर आता अर्थमंत्र्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी यापूर्वीच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे. त्यांची ही मागणी मान्य करत अर्थमंत्री शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाले तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना संजीवनीच मिळणार आहे.
याच बरोबर अर्थमंत्र्यांवर इंधनदरवाढीचा निर्णय, देशाचा मंद झालेला आर्थिक विकास दर, या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार अर्थमंत्र्यांना करावा लागला आहे. अर्थमंत्र्यांनी गुरुवारी वर्षभराची अर्थसमीक्षा सादर करताना देशाच्या आर्थिक विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्यांच्या संसदेतील भाषणावरून काही संकेत मिळाले नसले तरी शेतकर्यांच्या कर्जमाफीविषयी ते गंभीर असल्याचे जाणवले. दि 29 ला ते अर्थसंकल्प कसा मांडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.