अर्थमंत्र्यांनी प्रत्येक वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न या बजेटमधून केला आहे. अगदी मध्यमवर्गीयांनाही त्यांना गरजेच्या वाटत असलेल्या वस्तूही अर्थमंत्र्यांनी स्वस्त करून दिल्या आहेत. त्यामुळे कार, दुचाकी, सेट टॉप बॉक्स आदी वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मात्र आता सिगरेटचा धूर महागडा ठरणार आहे आणि मोबाईल हॅँडसेटच्या क्रेझलाही त्याच्या वाढत्या दरामुळे थोडा आळा घालावा लागेल.
अर्थमंत्र्यांनी कारच्या किमती स्वस्त करून मध्यमवर्गीयांना कार विकत घेण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे अर्थात त्याचा प्राप्तीकरही वाचू शकतो. एकीकडे नोकरदार किंवा शहरी मध्यमवर्गाची ही काळजी वहात असताना खेड्यातील शेतकरी वर्गासाठीही अर्थमंत्र्यांनी खते स्वस्तात उपलब्ध करून देऊन चांगली भेट दिली आहे. शिवाय क्रूड ऑईल व अरिफाईन्ड सल्फरवरील कस्टम ड्यूटीही कमी केली आहे.
कोंबड्या व इतर जनावरांसाठीचे अन्नही स्वस्त झाले आहे. कारण त्याच्यावरची कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्याचवेळी आरोग्याची काळजी वाहताना सहा विशिष्ट औषधांवरील आणि घाऊक औषधांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. ड्रग फॉम्युलेशन्सवरील अबकारी कर आठ टक्क्याने म्हणजे जवळपास निम्म्याने कमी केला आहे. एड्सवरील औषधांनाही सवलत दिली आहे.