मुंबई होते उद्योगनगरी

PR
'मुंबई होते उद्योगनगरी' या गंगाधर गाडगीळ लिखित छोटेखानी पुस्तक वाचनीय ठरले आहे. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी या राजधानीचा पाया कसा आणि कुणी घातला? त्यावेळच्या रंजक आठवणी यात ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.

मुंबईच्या विकासात जमशेदजी टाटा यांच्या महत्त्वपूर्ण सहभागाबरोबरच पुढे येऊ घातलेल्या कामगार चळवळीचा पायाही कसा उभा राहिला याचा रंजक इतिहासही यात आहे.

मुंबईत 1880 साली सुरू झालेल्या पहिल्या कापड गिरणीच्या सुरवातीचा इतिहास, त्यावेळचे हिंदुस्थानातील वातावरण, देशी व विदेशी व्यापार्‍यांचा अंतर्गत संघर्ष, त्यातूनच विदेशी व्यापार्‍यांनी स्थानिक कामगारांच्या सोयी सुविधांसाठी दिलेला पाठिंबा याची माहिती मुळातून जाणून घेण्यासारखी आहे.

जमशेदजी टाटांच्या वेगवेगळ्या उद्योग उभारणीची माहिती तर आहेच पण त्यांचे दूरदर्शी विचार, कापड गिरणी नागपूरला मध्यवर्ती म्हणून सुरू करण्यातला दुरदर्शीपणा व त्यातून पुढे उभी राहीलेली वस्त्र उद्योगाची बाजारपेठ यांची चांगली माहिती मिळते.

यात जमशेदजींच्या उद्योगांचा चढता आलेख आहे तशीच कामगार चळवळीचे आद्य नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचीही माहिती व ते कसे या चळवळीचे प्रणेते बनले याचीही माहिती या पुस्तकात आहे.

ह्या पुस्तकातील माहिती उद्‍बोधक तर आहेच पण ती अजून थोड्या विस्तृत स्वरूपात असती तर वाचनाचा आनंद द्विगुणीत झाला असता.

पुस्तकाचे नाव- मुंबई होते उद्योगनगरी
लेखक- गंगाधर गाडगीळ
प्रकाशक- ग्रंथायन प्रकाशन
पाने- ५६
किंमत- ६० रूपये

वेबदुनिया वर वाचा