पुस्तक परिचय : एक सर्वोत्तम कवितासंग्रह - उंबराचे फुल

कवी केशवराव संभाजीराव शिंदे यांच्या उंबराचे फुल या कवितासंग्रहामध्ये मन मोकळ्या शब्दांची उधळण आणि नवनवीन शब्दाचा प्रयोग कवीने अतिशय सुबक पद्धतीने केला आहे. निसर्ग सृष्टीच्या नियमाप्रमाणे कोणत्याही वृक्षाला फळ धारण होण्याच्या सुरुवातीला फुलं यावी लागतात. तसेच उंबराचे झाड सुद्धा असते परंतु अनेकांना उंबराचे फुल पाहणे नशिबात असेलच असे नाही. कोणी असे फुल पहिले आहे का असा प्रश्न केला तर ब-याच जणांची उत्तरे नाही असे येईल. परंतु उंबराच्या झाडाला फुलं येतात हे देखील सत्य आहे. ती सर्वानाच पाहता येतील असे नाही.
 
कवी केशवराव संभाजीराव शिंदे यांच्या कवितासंग्रहातील पहिली कविता वाचल्यानंतर आपणाला लक्षात येईल कि, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ती म्हणजे "Give Respect, Take Respect" हे महाराष्ट्रा, जय महाराष्ट्रा म्हणत असतांना संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो. जसा हिमालय भारताचा अभिमान आहे, तसाच सह्याद्री सुद्धा महाराष्ट्राची शान आहे असे कवीने सुचवले आहे.
 
स्वतः ची ओळख लपविणे खूप कठीण आहे आज या जगात. आपण पाहत आहे कि, स्वतःची काय ओळख आहे. हे अनेकजण ओरडून ओरडून सांगत आहेत. स्वतः ची प्रसिद्धीसाठी अनेक व्यक्ती मोठ्ठ मोठे फलक आणि त्यावर स्वतःचा फोटो लावला जातो. परंतु जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले होते तेव्हा स्वतःची ओळख लपवून गेले. स्वतःची ओळख लपवण्याची पाळी ज्यांच्यावर आली, त्याची जाण फक्त त्यांनाच माहित असते.
 
पुढे कवीने 'फरक' या कवितेतून स्वतःचे अस्तित्व शोधण्यास सांगितले आहे. मानव हा एकमेव प्राणी आहे ज्या मध्ये अहंकाराचे प्रमाण खूप आहे. प्रत्येकाला दोन मने असतात अशी भ्रामक कल्पना जवळ ठेवून जे काही चांगले केले ते चांगल्या मनाने आज्ञा दिली म्हणून आणि जे स्वतःच ह्या हातून चुकीचे घडते ते स्वतःच्या अहंकारातून घडते हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वतःशी नेहमी स्पर्धा असावी इतरांशी नव्हे. प्रत्येकामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात; एक आकाशातून खाली पाहणारा तर दुसरा जमिनीवरून आकाशाकडे पाहणारा. जे विचार आकाशाकडून जमिनीकडे पाहतात तो अहंकार असतात ते जे विचार जमिनीकडून आकाशाकडे पाहतात तो स्वतःचा आत्मविश्वास असतो.
 
प्रत्येकाच्या जीवनातील दिवस आणि प्रत्येक दिवसातील वेळ एक सारखीच असते. परंतु त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करावयाचा हे ज्याचे त्याच्या हातात असते. प्रत्येक दिवसाचे 24 तास आपण कार्यरत असणे त्याच बरोबर स्वतःसाठी आणि इतरांच्या प्रगतीसाठी आपण काहीही करू शकलो नाही तर तो दिवस व्यर्थ गेला असे समजायला हवे. मावळण्यासाठी उगवणे व उगवण्यासाठी मावळणे म्हणजेच जीवन होय.
 
कवितासंग्रह म्हटले कि, तरुण पिढीतील व्यक्तींसाठी आकर्षणाचा विषय असतो. तो म्हणजे प्रेम आणि मैत्री. कवी केशवराव संभाजीराव शिंदे यांनी 'गझल' या कवितेतून खरा मित्र कशा पद्धतीचा असतो याचा अर्थ सांगितला आहे. त्याचबरोबर तरूणपिढी नक्कीच नवनवीन बदल घडवतील अशी मनात आशा आहे. परंतु या कलियुगात नक्की काय करायचे ह्याच प्रश्नामध्ये तरूणपिढी गुरफटून गेल्याचे वास्तव चित्र डोळयांसमोर दिसून येते. देशाविषयी प्रेम मनी बाळगणारे खूप आहेत, परंतु देशासाठी मनापासून काहीतरी करणारे बोटावर मोजण्या इतपतच आहेत अशी खंत कवीने व्यक्त केली आहे.
 
कवी केशवराव संभाजीराव शिंदे यांचा उंबराचे फुल हा कवितासंग्रह वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा विविध क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि एक मोठे समाज परिवर्तन घडण्यास मदत होईल. अशी आशा व्यक्त करतो आणि कवी केशवराव संभाजीराव शिंदे व प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
 
- मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) 9028713820

वेबदुनिया वर वाचा