एक होता राजा

PR
बडोद्याच्या गायकवाड घराण्यात सयाजीराव गायकवाडांचे स्थान काही आगळेच आहे. बडोद्यातील सामाजिक, सांस्कृतिक विकासात सयाजीरावांचे योगदान मोठे होते. सयाजीरावांचे हेच गुण गंगाधर गाडगीळांच्या 'एक होता राजा' या छोटेखानी पुस्तकातून मांडले आहेत.

सयाजीराजे गादीवर येण्यापूर्वीचा इतिहास, खंडेराव गायकवाडांची सत्ता, नंतर त्यांचा खून केल्याचा मल्हाररावावरचा आरोप, त्यानंतर त्यांना लाभलेली राजगादी, पण आजूबाजूचे खुषमस्कर्‍या करणार्‍या गोतावळ्यांला असलेला सत्तेचा हव्यास, त्यांचे स्वतःचे अध:पतन अन् त्यातून बाहेर पडण्यासाठी बडोदा संस्थानचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी दादाभाईंनी वेळोवेळी केलेला प्रयत्न हे मुळातून वाचण्यासारखे आहे.

त्यावेळी इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारलेली सगळी संस्थाने, त्यात राबवलेली इंग्रज धार्जिणी धोरणं, त्याला झालेला विरोध, त्यात झालेली कटकारस्थाने, हे वाचताना आताही न बदललेल्या राजकारणाचीच पुन:पुन्हा आठवण येते.

मल्हाररावांच्या तुरुंगवासानंतर खंडेरावाच्या विधवा पत्नीने राजगादीवर बसवण्यासाठी दत्तक घेतलेला हा पुत्र गोपाळराव उर्फ सयाजी त्याची निवड किती योग्य होती हे त्यांनी त्यांच्या शिक्षणापासुनच दाखवून दिले. पुढे त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून बडोदे संस्थानात जी प्रगती घडवून आणली त्याची माहिती या पुस्तकात आहे.

सयाजीराजांनी आपल्या संस्थानात केलेले वेगवेगळे अभिनव प्रयोग, मुलींच्या शिक्षणाला संस्थानात दिलेला अग्रक्रम त्या वेळीच्या कट्टर वातावरणात परदेशगमन हे पाप मानले जात असतानाही त्यांनी वरचेवर केलेला परदेश प्रवास, तेथील वास्तुवैशिष्ट्य, चित्रकला, शिल्पकला यांना इथे आणण्याचे प्रयत्न, वेगवेळ्या कलागुणांना वाव देणारं वातावरण, स्त्रीला बरोबरीचा दर्जा देण्याचा रिवाज या सर्व गोष्टी हिंदुस्थानाच्या आधी बडोदे संस्थानात लागू झाल्या.

दर्जेदार ग्रंथालय, खर्चिक कारभाराला आळा, योग्य न्यायपद्धती कारभारात एकसुत्रता, योग्य व्यक्तिची पारख करून त्यांना योग्य अधिकाराची जागा देऊन त्यांना न दुखवता त्यांच्याकडून काम करवून घेण्याची त्याची पद्धत पण हे सगळे करताना त्यांच्या शरीराची झालेली हेळसांड, त्यांच्या प्रथम पत्नीचा मृत्यु ह्या सगळ्याचे वर्णन या पुस्तकात आहे.

त्यांच्या राज्यविस्ताराचे, राज्यसुधारण्याचे वर्णन या पुस्तकात आहे पण त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाविषयी शेवटविषयी हे पुस्तक भाष्य करत नाही. कदाचित त्यांच्यातला राजाचीच माहिती लोकापर्यंत पोहोचवणेच गाडगीळांना अपेक्षित असावे म्हणूनच सयाजीराजांच्या मृत्युविषयीचे वर्णन यात नाही.

पुस्तकाचे नाव- एक होता राजा
लेखक- गंगाधर गाडगीळ
प्रकाशक- ग्रंथायन प्रकाशन
पाने- ८८
किंमत- ९०

वेबदुनिया वर वाचा