"विविधा" हा कवयित्री सौ.आश्लेषा निलेश राजे यांचा पहिलाच काव्यसंग्रह.
शॉपिजन या दर्जेदार प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची प्रथम आवृत्ती मार्च २०२२ मध्ये प्रकाशित केली आहे. ९० पानी या काव्यसंग्रहात निरनिराळ्या प्रकारातील ५१ कविता आहेत. कविता जर सुंदर शब्दांनी सजलेल्या असल्या तर त्या आपल्याला आवडतात आणि त्या प्रतिके व उपमांनी नटलेल्या असल्या तर मनाला जास्त भावतात.
या काव्यसंग्रहातील कवितासुद्धा अश्याच सुंदर सुंदर शब्दांनी सजलेल्या आहेत. "प्रारंभ तू" या पहिल्या ८ ८ ८ ७ वर्णांत लिहिलेल्या कवितेत कवयित्रींनी भगवान श्रीकृष्णाची सुंदर महती वर्णिली आहे. एका कडव्यात त्या लिहितात,
स्वरांतील ओंकार तू
सृष्टीतील शृंगार तू
निर्विकार साकार तू
दुष्टांचा संहार तू
श्रीकृष्णावर अनेकांची भक्ती आहे. त्याच्यावर तसेच राधेवर व त्या दोघांच्या प्रेमावर अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत. कवयित्री आश्लेषा यांनीसुद्धा कृष्णावर व राधेवर लिहिलेल्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. या कविता वाचल्यावर कवयित्रींची श्रीकृष्णावर भक्ती असावी असे वाटते.
राधा व श्रीकृष्ण यांना एकमेकांविषयी वाटणारी ओढ, प्रेम कवयित्रींनी सुंदर शब्दांत त्यांच्या कवितेतून दाखवले आहे. याची प्रचिती आपल्याला खालील ओळी वाचल्यावर येते.
चंद्रबिंबा होई
घननिळी बाधा
सावळे गोंदण
गोंदविते राधा
पाही प्रतिबिंब
यमुनेच्या पात्री
हासतो श्रीरंग
अनिमिष नेत्री
(कविता - प्रतिबिंब)
नाते तुझे नी माझे
कळणार ना कुणाला
मी काय नाव देऊ
ह्या मुग्ध भावनेला
तो आईना बिलोरी
रूप दावतो तुझे रे
माझी न मी ही उरले
प्रतिबिंब मी तुझे रे
(कविता - प्रिय कृष्णास)
दगडाला शेंदूर फासल्यावर त्याला देवपण कसे येते हे त्यांनी "दगड" या कवितेत सुंदररीत्या दाखवले आहे. "आनंदाची पखरण" या सुंदर दीर्घ निसर्ग कवितेत सुंदर शब्दांची पखरण केली आहे. एका कडव्यात त्या लिहितात,
पाहून शोभा दिव्य नभी
लहरींची दाटी झाली
चुंबून घेण्या निळ्या सागरा
बिंब उतरले खाली
शेवटच्या कडव्यात कवयित्री लिहितात,
निसर्ग सुंदर क्षणाक्षणाला
चित्र मनोहर दावी
आनंदाची पखरण करतो
किती रूपे वर्णावी
ही कविता वाचल्यावर आपल्या डोळ्यांसमोर तो निसर्ग,त्याची किमया तर उभी राहतेच पण कवयित्रींकडे निसर्गातील क्षण सुंदररीत्या टिपण्याची नजरसुद्धा आहे याचा प्रत्यय येतो.
"ती भेट" या षडाक्षरी कवितेत सांजवेळी नदीच्या किनारी प्रेयसीची वाट पाहत असलेल्या प्रियकराची मनोवस्था मांडली आहे. कवितेच्या शेवटी खूप छान कलाटणी दिली आहे. संत ज्ञानेश्वर यांची थोरवी त्यांनी सुंदर शब्दांत "स्पर्श तुझिया शब्दांचा" या कवितेत वर्णिली आहे.
"विस्कटलेला कवी" या दीर्घ कवितेत कवयित्रींनी कवीचे रोजचे जगणे, त्याचे हळवे व संवेदनशील मन, त्याला कवितांची असलेली ओढ, कवितेविषयीच्या त्याच्या भावना समर्पक शब्दांत दाखवल्या आहेत.
"मन" या सप्ताक्षरीत मन म्हणजे काय याची छान उकल केली आहे. कवयित्रींनी गीत प्रकारही छान हाताळला आहे. विरहात तळमळणाऱ्या प्रेयसीच्या मनातील विचार त्यांनी "शहारा" या गीतात परिणामकारक शब्दांत व्यक्त केले आहेत. त्या लिहितात,
श्वास गंधाळून वेडी, रातराणी बहरली
प्रीत वेड्या चांदण्याने, रात सारी सजवली
स्पर्श जो झालाच नाही, उठवतो का शहारा
पापण्यांचा भार डोळा, लाज बसवे पहारा
नीज नाही चैन नाही, स्वप्नील वीणा छेडली
या काव्यसंग्रहातील बहुतेक कविता या छान लयबद्ध आहेत व शब्दही साधे, सोपे व सुंदर आहेत, त्यामुळे या काव्यसंग्रहातील कविता सर्वांनाच आवडतील.
या पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ शॉपिजननेच चितारले आहे. पुस्तकाची छपाई व कागद उत्कृष्ट दर्जाचा आहे.