नजर : अप्रतिम नजराणा !

ऋचा कर्पे हे नाव मराठी साहित्य क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव! तद्वत शॉपिज़न. ईन ही प्रकाशन संस्थाही एक अग्रगण्य साहित्य संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. शॉपिज़न या संस्थेच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून ऋचा कर्पे यांनी पदभार स्वीकारला आणि मराठी साहित्य क्षेत्रातील ज्या ज्या लेखकांचे साहित्य ऋचा यांच्या 'नजरे'त भरले ते प्रकाशित होत गेले. जुने साहित्यिक असतील, नव्याने लिहिणारे शेकडो लेखक असतील सर्वांना एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ मिळवून देण्यात ऋचा अग्रेसर असतात. नानाविध साहित्य स्पर्धा आयोजित करून लेखकांना लिहिते करण्यात ऋचा कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. या स्पर्धांमधून जे अक्षरधन त्यांना सापडले ते पुस्तकाच्या स्वरूपात आकर्षक रीतीने वाचकांसमोर आणणे हा ऋचा यांचा छंद बनला. सोबत गुढीपाडवा विशेषांक, दसरा-दिवाळी विशेषांक असे अंक प्रकाशित करताना लेखकांना वाचकांसमोर नेण्याची त्यांची तळमळ प्रामुख्याने जाणवते.
 
यावरून ऋचा कर्पे यांना साहित्याची किती गोडी, आवड आहे हे लक्षात येते. सोबतच त्यांनी स्वतःचे शब्दधनही वाचकांसमोर ठेवले आहे. आजपर्यंत त्यांची कथा आणि काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक नामांकित साहित्य पत्रिकांमधून त्यांचे साहित्य प्रकाशित होत आहे. बऱ्याच सामाजिक संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर त्या काम करतात ज्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा जिवंत असल्याचा प्रत्यय येतो.
 
'नजर' हा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला लेखसंग्रह! अत्यंत आकर्षक अशा मुखपृष्ठावर छापलेली 'गोष्टींना बघण्याचा एक 'अलग' दृष्टिकोन' ही ओळ लक्ष वेधून घेते आणि काही तरी वेगळं वाचायला मिळणार ह्या आशेने वाचक पुस्तक हातात घेतो. पुस्तकाचा कागद, छपाई, अक्षरांचा आकार हे सर्व लक्षवेधी आहे. शॉपिज़न संस्थेचे प्रमुख उमंग चावडा यांचे मनोगत हा ऋचा यांच्यासाठी आशीर्वाद आहे.
 
या संग्रहाची पाठराखण करताना ऋचा एक महत्त्वाचे वाक्य लिहितात, 'कुठल्याही गोष्टीबद्दल मत मांडण्याआधी तिला इतरांच्या नव्हे तर स्वतःच्या नजरेतून बघणे आवश्यक आहे.... एखादी गोष्ट सर्वांना आवडली म्हणून ती चांगलीच आहे, किंवा एखाद्या गोष्टीची सर्वांनी निंदा केली, म्हणून ती वाईटच असणार, असे नसते...' फार मोठा मोलाचा संदेश या वाक्यात दडलेला आहे. माझं साहित्य, माझी निर्मिती ही आधी मला आवडली पाहिजे. ती इतरांना आवडेल, न आवडेल हा भाग निराळा. ती प्रत्येकाला आवडलीच पाहिजे असा अट्टाहासही कामाचा नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाची आवड-निवड, छंद वेगळा असतो. 'कुणी निंदा, कुणी वंदा, लिहित राहणार हा बंदा' याप्रमाणे लिहित राहावे. काही तरी चांगले लिहिण्याची सवय नि सातत्य ठेवावे.
 
वरील वाक्यातून ऋचा यांचा हा लेखसंग्रह वाचण्याची एक नजर मिळताच वाचक अंतरंगात शिरतो. भावस्पर्शी अर्पण पत्रिकेनंतर अनुपमा नितिन विजयन यांची प्रस्तावना आणि ऋचा यांचे मनोगत वाचनीय आहे. लेखसंग्रहाची, लेखिकेच्या भावभावनांची ओळख करून देणारे आहेत. सत्तर पानं असलेल्या या संग्रहात वैविध्यपूर्ण, नाविण्यपूर्ण असे एकूण अठरा लेख आहेत. त्यांच्या शीर्षकावरून ऋचा यांची 'नजर' किती हटके आणि काकदृष्टी आहे हे समजते.
 
'लाल फुलांच्या फांदीवर' ह्या पहिल्या लेखात लेखिकेच्या तरल मनाचे प्रत्यंतर येते. त्यांच्या घरासमोर असलेल्या एका बंगल्याच्या टेरेसवरील लालफुलं त्यांचं लक्ष वेधतात. सूर्यप्रकाश येताच रत्नाप्रमाणे चमकणाऱ्या त्या फुलांच्या अवतीभवती चिमण्या मस्तपैकी खेळत असताना लेखिका जेव्हा या चिमण्यांशी मनोमन संवाद साधते तेव्हा एक चिमणी म्हणते, 'पंख तर तुमचे पण आहेत, मन तर तुमचे पण आमच्यासारखे हलके आहे पण त्यावर तुम्ही अनंत इच्छा-आकांक्षांचे, काळजीचे ओझे ठेवले आहे...' 
 
किती समर्पक भावना आहेत. आज प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या चिंतेच्या चितेवर जळत असतो. जसे प्राण्यांना स्वछंदी जीवन जगता येते तसे मानवाला जगता येत नाही कारण तो विकृत स्पर्धेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. हे चक्रव्यूह भेदून तो जेव्हा बाहेर येईल तो खरा त्याच्या आनंदी, समाधानी जीवनाचा प्रारंभ असेल. भौतिक सुखांचा डोंगर सभोवताली असेल पण त्या सुखाभोवती भांडणे-तंटे, हेवेदावे, असूया, छोट्या छोट्या गोष्टींचे नैराश्य अशा नकारात्मक पायऱ्या असतील तर मानव तो डोंगर चढू शकणार नाही.
 
चिमणीचा संदेश घेऊन पुढे डोकावणाऱ्या वाचकांच्या स्वागतासाठी आषाढ मास सज्ज आहे. आषाढ महिना आला की, अनेक गोष्टी आठवतात. त्या सांगून लेखिका एका मानवीय गुणधर्माकडे हळूच लक्ष वेधते तो म्हणजे मनुष्य देवाजवळ नेहमी, सतत काही ना काही मागत असतो. आषाढाचे अनेक गुणधर्म सांगताना जणू आषाढ म्हणतो,
'देव आता झोपणार, तुमची संकटे, तुमचे प्रश्न आता तुम्हीच सोडवा, निदान प्रयत्न तरी करा...' ऋचा असा समाजोपयोगी संदेश अनेक ठिकाणी देतात.
 
'प्रेम' शब्द उच्चारला की, ऐकणारांच्या समोर एक वेगळीच छबी उभी राहते. प्रश्नांचे वाटोळे गरगरत राहते परंतु प्रेमाच्या चौकटीच्या बाहेर जागोजागी प्रेम आहे. ही अशी नाती आणि त्यातील प्रेमळ संबंध लेखिकेने खूप सुंदरतेने व्यक्त केले आहेत.
 
संक्रांत म्हटलं की, महिला प्रफुल्लित होतात. खरेदीची लगबग सुरू होते. साडी, वाणाचे नि खाण्याचे सामान अशा बाबींची यादी नि चर्चा सुरू होते. परंतु लेखिका ऋचा कर्पे यांची संक्रांतीकडे पाहण्याची नजर थोडी हटके आहे... ती वक्र नाही. 'संक्रांत वही, वजह नई' लेखाच्या अशा शीर्षकातून लेखिकेचा नवविचार लक्षात यावा. ऋचा जी की नई वजह क्या है, यह जानने के लिए यह लेख पढ़ना जरुरी है।
 
काही दशकांपूर्वी घराघरांतून 'शुभं करोति कल्याणम्' आणि इतर प्रार्थनांचे सूर कानी पडत असत परंतु आजकाल हे स्वर हरवले की काय असे वाटत असतानाच लेखिकेचा वेगळा, सकारात्मक दृष्टिकोन लेखात वाचायला मिळतो.
 
कृष्ण! सर्वांचा तारणहार, सखा! 'कृष्ण समजलाच कुठे आपल्याला' या लेखात लेखिका कृष्णाची विविध रुपे सांगतात नि लिहितात, एखादे संकट समोर आले, द्वंद्व सुरू झाले की, डोळे मिटताच कृष्णाची छबी समोर येते, हात आपोआप जोडून आपण धावा करतो आणि मार्ग सापडतो. कारण कृष्ण सांगतो, जेव्हा समस्या येते तेव्हा त्यासोबत एक उपाय सुद्धा जन्माला येतो...' असे सांगून लेखिका भक्तीभावाने कृष्णाची महती सांगताना कृष्ण आपल्याला समजलाच नाही अशी चर्चाही करतात.
 
अनेकविध विषयांवर लिहिताना ऋचा 'भारत माता की जय' या लेखात तिरंगा झेंड्याची महती गातात. नुकताच आपण 'हर घर तिरंगा...' हा कार्यक्रम साजरा केला. यासंदर्भात मनमोकळी चर्चा ऋचा यांनी केली असून अनेक उदाहरणे देऊन तिरंग्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. 'हर घर तिरंगा ' या कार्यक्रमास ज्यांनी विरोध केला त्यांनी हा लेख आवर्जून वाचायलाच पाहिजे.
 
भुलाबाई! आज स्पर्धेच्या आणि विभक्त कुटुंबपद्धती शिवाय शहरीकरणाच्या नादात जुन्या काळातील संस्कारक्षम गाणी, खेळ, संवाद हरवत चालले असताना ऋचा कर्पे यांनी अत्यंत विस्तृतपणे, वेगवेगळी उदाहरणे, गीतांचा संदर्भ देऊन लिहिले आहे. ज्यांनी हे सारे अनुभवले आहे, पाहिले आहे त्यांना ऋचा निश्चितच रम्य भूतकाळात घेऊन जातात.
 
केव्हा तरी पहाटे... हे शब्द कानी पडताच काही छान गाणी आठवतात. ऋचा यांनी लेखात 'पहाट' हा शब्द घेऊन पहाटेची विविधांगी रूपे वाचकांपुढे उभी केली आहेत.
 
'राधेय' ही कादंबरी ऋचा यांची आवडती कादंबरी आहे. ह्या कादंबरीवर भाष्य करताना लेखिका 'राधेय'चे लेखक रणजीत देसाई यांचे एक सुंदर वाक्य उद्धृत करतात...
 
'प्रत्येकाच्या मनात दडलेला एक कर्ण असतो... आपल्या मनाची चार पाने उलटली तर हा कर्ण दिसेल...' यावरून ऋचा यांचे वाचन किती सखोल आहे याची प्रचिती येते.
 
बाप्पा! आबालवृद्धांना प्रिय असा! बाप्पाचे आगमन म्हणजे एक महोत्सव! आनंदोत्सव! अनेक दशकांपासून गणेशोत्सव सुरू आहे. बदलत्या काळानुसार ह्या महोत्सवाचे स्वरुप ही बदलत गेले. नेमकी हीच बाब हेरून लेखिकेने विस्तृत माहिती दिली आहे.
 
लेखिका ऋचा कर्पे जशा भुलाबाई खेळात रमतात तशा त्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही पूरेपूर वापर करताना टैक्नोफ्रेंडली होणे ही काळाची गरज आहे हे ठामपणे मांडतात. टैक्नोफ्रेंड ही नवीन संकल्पना मांडताना त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांनी टिपलेले सामाजिक बदल वास्तव आहेत. कविवर्य मंगेशकर पाडगावकर हे ऋचा यांचे आवडते कवी असावेत कारण अनेक लेखांमधून त्यांनी कविवर्यांच्या कवितांच्या ओळी उद्धृत केलेल्या आहेत. या आस्वादकात्मक लेखाचा शेवटही त्यांनी उद्धृत केलेल्या ओळी वाचून करु.... कवी पाडगावकर...
आपण ओढ लावल्याखेरीज, पाणी नसतं आपलं,
कोऱ्या कोऱ्या कागदावर असल जरी छापल,
ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं... 

मलाही ह्या ओळी वाचताना वाटले.. सुचले ते असे...
  पुस्तक झालं जरी वाचून
  प्रतिक्रिया दिल्याखेरीज
  लेखकाच मन येत नसतं भरून 
ऋचा कर्पे यांची भाषा साधी, सोपी, रसाळ आहे. त्यामुळे समजायला अवघड जात नाही. सारे लेख छोटे छोटे आहेत त्यामुळे कंटाळवाणे होत नाहीत. अनेक लेखांमध्ये नवीन काही तरी असल्याने ते वाचनीय नि काही शीर्षकांमुळे उत्कंठावर्धक आहे. आगामी लेखनास भरपूर शुभेच्छा!
                  
नजर :     लेखसंग्रह
लेखिका: ऋचा दीपक कर्पे
प्रकाशक: शॉपिज़न. ईन
पृष्ठसंख्या: ७०
किंमत:      ₹२२७/- 
आस्वादक: नागेश सू. शेवाळकर
                  पुणे
                  (९४२३१३९०७१)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती