गूज अंतरीचे कविता संग्रह समीक्षण

शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:40 IST)
प्रथम काव्य केव्हा निर्माण झाले असेल बरं ! अगदी वाल्मिकी ऋषींपासुन ते आजपर्यंत विविध रुपात काव्यसरीतेचा प्रवाह आजतागायत चालूच आहे . संत, पंत, तंतपासून ते आजपर्यंत अखंड काव्ययज्ञ अव्याहतपणे चालत आला आहे. 

भावभावनेच उत्कट रूप शब्दांत व भाषेत मांडणी करणं म्हणजेच साहीत्य. अश्रू हे भावनेचे सगुण उत्कट रूप ! मग ते अश्रू आनंदी असो वा दुःखी... असे जरी असले तरी भावनेची प्रचिती ही शब्दांत विशिष्ट आकृतीबंधात साकारली की काव्य होतं.
 
तसंच कवयित्री सौ. सायली कुलकर्णी यांच्याबद्दल म्हणावे असे वाटते. त्यांनी पण ह्या साहित्य यज्ञात आपल्या काव्य समिधा अर्पण केल्या आणि हो त्या अगदी उस्फूर्तपणे.अचूक उस्फूर्तता हाच गुण जपत त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते त्यांच्या पहिल्या वाहिल्या काव्य संग्रहाने ! "गूज अंतरीचे "
 
त्यांचं साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल उमटलं आहे ते कोरोना लॉक डाऊन मुळे ! कोरोना चे दैवी संकेत पण असे अगम्य आहेत !
 
'गूज अंतरीचे' बद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या अंतरात समुद्र मंथन असल्याचेच दिसते ! त्यांच्या सागरातील प्रतिभांच्या लाटा अनेक विधी भावोत्कट विषय घेऊन अंतरीचे मंथन करून त्यांनी ५१ काव्यरत्नांची रसिकांना भेट दिली आहे.
 
जीवन सुंदर आहे'  ह्या कवितेत त्या म्हणतात
"जीवन म्हणजे ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ असतो"
"कितीही कडक ऊन पडले तरी पाऊस हा नक्की येतो
थकल्या भागल्या जीवांना नवसंजीवनी देऊन जातो"
"जीवन सुंदर आहे गड्या निखळ जगता आले पाहिजे
आनंदाचे चार क्षण वेचता आले पाहिजे"
 
जीवनात त्यांनी सकारात्मकतेचा भाव ठेवला आहे, जीवन जगण्यासाठीची असोशी पण त्यांनी दाखवली आहे. जीवनात चढ उतार हे येणारच असे सांगताना त्या म्हणतात 
"जीवन सापशिडीचा खेळ आहे
आपण खेळत जायचे
शिडी आली वर जायचे 
सापालाही तयार राहायचे"
 
जीवनाकडे बघण्याचा कवयित्रीचा दृष्टिकोनच किती उच्च विचारांचा आहे! नकारात्मक भावना टाळून फक्त प्रयत्न वादी राहण्याचा सल्ला त्या देतात.

'नवी पहाट' ह्या काव्यात पण हाच विचार मांडताना त्या म्हणतात
"नको होऊस निराश सखये
थोडा धीर धर
पानगळ झाली तरीही पुन्हा
येतोच ना ग बहर"
 
अशा श्रध्दा आणि सबुरीच्या विचारांमधून त्यांची जीवनाबद्दलची असोशीच तर दिसून येते.
 
"इवले कोवळे बीज सखे सांग
लगेच कोठे रुजते
कवच धरेचे भेदल्याविन
का ते धरतीवर अवतरते"
 
निसर्गनियम कसे असतात त्या प्रतिमेचा वापर करून त्यांनी सखीला धीर दिला आहे. पुढे त्या 'मन' ह्या काव्यात म्हणतात
 
"शांत निळ्या आभाळात
कसे दाटती काळे मेघ
ऊन कोवळे असतानाही
का धरणीला पडते भेग? "
 
असे निसर्गातील प्रश्नाचे रुपक देऊन त्यांनी मनाच्या अवस्थेचे वर्णन केले आहे. एवढंच नाही तर शुद्ध प्रांजळपणा हा गुण कवयित्रीच्या अंगी ठासून भरलेला दिसतो
 
'साफ सफाई' ह्या काव्यात त्या चक्क मनाची साफ सफाई करण्यात मश्गुल होतात
"मी ठरवलं एकदा आपलं मन आवरायला घ्यायचं
साचलेली जळमटं काढून
मन स्वच्छ लख्ख करायचं"
 
घराची सफाई आपण नेहमी करतोच पण, ह्या मनाची सफाई करताना षडरिपूंना त्यांनी मनातुन निवृत्त केलं एक अध्यात्मिक बोध सरळ सरळ ह्या काव्यातून त्यांनी प्रकट केला आहे !
 
कर्म विपाक विचार मांडताना त्या आपल्या 'भोग' कवितेत म्हणतात, भोग हे भोगून दूर करायचे असतात. वाट्याला आलेले भोग गिळायचे असतात
"सांगा बर देवाला तरी भोग काही चुकले का ?
देव असूनही रामाला वनवास सांगा टळला का ?" 
असा खडा सवाल सुद्धा त्या करतात.
 
कवयित्रीच्या स्त्री सुलभ भावना या त्यांच्या आईची माया, येसी एकदा भेटाया, बाप, डोंबारी इत्यादी काव्यातून दिसून येतात. जीवन प्रवासातील मिळालेले अनुभव, निरीक्षण शक्ती, चिंतन मनन, वाचन, वेदना, सल आणि स्त्री प्रपंच जबाबदारी यांचा परिपाक म्हणजेच त्यांचा हा काव्य संग्रह होय.
 
गूज अंतरीचे न राहता ते सर्व समावेशक होते हेच त्यांच्या काव्यप्रतिभेचे द्योतक व यश आहे. साध्या सोप्या रसाळ भाषेत काव्य लेखनाची हातोटी त्यांना लाभलेली आहे, म्हणूनच त्याची प्रासादिकता आणखी भावते, रुचते व नात रुंजी घालते.
"फळे लगडावी मधु
यावा बहर फुलांचा
जावा परिमळ दूर
माझ्या काव्यसुमनांचा"
"पानगळ ती न व्हावी
नित्य वसंत फुलवा
माझा काव्य वृक्ष्य सदा
बारा माही बहरावा"
 
अशी दुर्दम्य इच्छा शक्ती घेऊन येणाऱ्या कवयित्री, "सायली कुलकर्णी "यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांची काव्य प्रतिभा शारदीय प्रांगणात उत्तरोत्तर बहरो, अशी प्रार्थना करून मी तुमची रजा घेत आहे. 
 
आपला विनीत -
प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी  ( मधु संचय )
अंकली / बेळगांव 
कर्नाटक.
 
काव्य संग्रह - गूज अंतरीचे
पृष्टे-१००
प्रथम आवृत्ती: ऑगस्ट २०२१
कवयित्री - सौ. सायली कुलकर्णी वडोदरा 
प्रकाशक-- शॉपीज़न पब्लिकेशन
स्वागत मुल्य - १६५ रु फक्त

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती