पुस्तक समीक्षा : झिरो मॅरेज

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (12:28 IST)
झिरो मॅरेज हा वर्षा कुळकर्णी ह्यांचा प्रसिद्ध झालेला दुसरा कथा संग्रह.
 
ह्यातील काही कथांमध्ये मालतीबाई निमखेडकर, आशा बगे यांच्या शैलीची झलक दिसते तर काही कथा गौरी देशपांडे, अमृता प्रीतम या प्रवाहातील आहेत. थोडक्यात समकालीन आहेत. मराठी साहित्य विश्वात एवढ्या मोठ्या कालावधीचे समकालीनत्व फारच कमी किंबहुना नाहीच. मालतीबाई व आशाताई या जुन्यापिढीच्या त्यामुळे त्यांच्या जाणीवा, अनुभव, exposure हे कालसापेक्ष मर्यादित आहे. बंडखोरी गौरी देशपांडे व अमृता प्रीतम यांची. गौरी देशपांडे यांनी स्त्री पुरुष संभोगाचेही कलात्मक वर्णन केले आहे. ह्या तिन्ही गोष्टींचं, शैलीचं व्यामिश्र संगम झिरो मॅरेज मध्ये आढळतो. तीन प्रातिनिधिक कालखंडाचा विचार केला तर १९०० ची नायिका पदरी पडले पवित्र झाले किंवा आलीय भोगासी म्हणून गप्प बसली असती १९१० ते १९४७ काळात स्वातंत्र्य संग्राम हेच प्राधान्य असल्याने हा विषयच बाजूला पडला. १९४८ ते १०७० ह्या कालखंडात हा विषय असू शकतो हा विचार, त्यावर वैद्यकीय उपचार नंतर मर्यादित बंडखोरी असा विचार आणि लेखन प्रवाह, प्रवास दिसून येतो.

आजची नायिका मर्यादित प्रयत्नानंतर बहुदा विभक्त किंवा स्वैर होईल. 'झिरो मॅरेज' ही वैद्यकीय की कायदेशीर संज्ञा ह्यात न जाता माझ्या मते नायिकेच्या भावना वर्षा कुळकर्णी ह्यांनी अतिशय संयमितपणे मांडल्यात. नायिकेचे मध्यमवर्गीय संस्कार तिला मोहाच्या क्षणापासून वाचवतात.शेवट मात्र काहींना न पटणारा आहे. कदाचित नायिका व तिच्या मित्राच्या मीलनानी ही कथा संपवली असती. कारण ती फसवणूक ठरत नाही. नायिकेने सर्व प्रयत्न करून थकल्यावर हिमाची म्हणजे मित्राची ती ऑफर नायिकेने स्वीकारायला हरकत नव्हती हे माझे प्रांजळ मत. अर्थात नायिकेला भासणारी गरजही महत्वाची. 'झिरो मॅरेज' ही कथा लेखनातील बंडखोरी नसून नायिकेचे प्रांजळ आत्मकथन आहे..प्रामाणिकपणे व्यक्त केलेल्या वेदना आहेत ज्या मनाला भिडतात. ही कथा वाचून लक्ष्मण १४ वर्षे वनवासात असताना उर्मिलेला सहन कराव्या लागणाऱ्या दु:खाची आठवण झाली. कथेतील नायिकेला तर सोबत राहूनही २५ वर्षाचा वनवास भोगावा लागतोय. तिचे हे दु:खं कुणाला दिसतही नाही आणि सांगताही नाही. नायिकेची मानसिक, भावनिक, शारीरिक, लैंगिक प्रचंड घुसमट, तडफड, तगमग लेखिकेने अतिशय ताकतीने मांडली आहे. बंडखोरी आणि संस्कार ह्यांचा लेखिकेच्या मनातील संघर्ष  झिरो मॅरेज, मानिनी, शिक्षा ह्या कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. ती लेखिकेची मर्यादा कि ताकत ह्या प्रश्नाच उत्तर व्यक्ती सापेक्ष किंवा काळ सापेक्ष असू शकत.
 
दया मरण, ईच्छा मरण हा सुद्धा असाच एक वादाचा विषय. प्रिय व्यक्तीच आपल्यात असणं आणि तीच प्रदीर्घ काळ अचेतन असणं ह्या दोन्हीही तश्या वेदनादायक गोष्टी. नेमका निर्णय काय घ्यावा हा त्या व्यक्तींना क्लेष कारकच. जीवन पत्र हा त्यातून सुटका देऊ शकणारा प्रभावी उपाय ठरू शकतो. लेखिकेने प्रतीक्षा ह्या कथेत तो  प्रभावी पणे मांडला आहे. लेखिकेतली दृष्टी आणि कालसापेक्ष विचारवृत्ती दिसते. अशाच विषयावर कॅलिफोर्निया अमेरिका स्थित लेखिका भाग्यश्री कावळे बारलिंगे ह्यांच्या एकांकिकेची आवर्जुन आठवण होते.
 
कथा हा प्रकारचं मुळी लेखकाचा वास्तव आणि नाट्य ह्याचा रंगपटल वाचकांना कधी निवेदन शैलीतुन, कधी संवादातून वाचकांनाउ लगडून दाखवण्याचा आहे. योग्य तो तोल सांभाळून वर्षा कुलकर्णीनी तो नविन विषयांसाठी वापरून नक्कीच संपन्न आणि प्रवाही केला आहे. 
 
- उदयन पाठक
फोन नं. 9225577035

साभार : महाराष्ट्र टाइम्स

वेबदुनिया वर वाचा