Book Review - व्यक्तिमत्व विकासाकरिता एक सर्वोत्तम पुस्तक - यशोमंत्रा

शुक्रवार, 20 मे 2016 (17:21 IST)
श्री. मंगेश विठ्ठल कोळी या तरूण लेखकाचे यशोमंत्रा हे छोटेखानी पुस्तक माझ्या वाचण्यात आले. लेखक तिशीतला तरूण आहे. परंतु लेखकाची प्रगल्भता साठीच्या पलीकडची वाटते. त्यांनी जीवनाचा यशोमंत्र देताना त्याचे काही ठराविक टप्पे पाडून काही ठराविक सकारात्मक गोष्टीकडे डोळसपणे पाहण्याची दूरदृष्टी दिली आहे. कोणतेही काम यशस्वी व्हायचे असेल तर देवापेक्षा व्यक्तीने काबाडकष्टाला महत्व देणे किती महत्वाचे आहे. हा मुद्दा चांगलाच भावतो. कामाचे उदिष्ट ठरवून त्या दिशेने वाटचाल करताना कितीही अपयश आले तरी न डगमगता त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी इतरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे परंतु त्यात गुरफटून न जाता व न घाबरता सकारात्मक दृष्टीने ठरविलेल्या डेडलाईनमध्ये ते काम पूर्ण करण्याचा बहुमोल सल्ला दिला.
 
स्वतःच्या गुणांची बेरीज करून नवीन वर्षाची सुरूवात करताना चांगल्याच बाबी विचारात घ्याव्यात व नकारात्मक बाबींना फाटा द्यावा हा लेखकाचा विचार मनाला भावतो. कामाची यशस्वीता ही त्यावरील निष्ठेवर आणि त्यातून मिळणार्‍या आनंदावर अवलंबून असते. केवळ कर्तव्य भावनेने कामाकडे न पाहता त्यातील आनंद लुटण्याच्या उद्देशाने ते केल्यास त्या कामातसुद्धा जीवनातील जगण्याचे सौंदर्य गवसते. काम ही पुजा आहे’ पुजेचे पावित्र्य आपण जितक्या निष्ठेने पाळतो. तिच निष्ठा कामाच्या बाबतीत ठेवल्यास यश आपलेच आहे हा कानमंत्र लेखक देऊन जातो. 
 
कामासाठी काही तरी प्रेरणा हवी. काम करताना व्यक्तीच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. हे पटवून देताना गाळात रूतलेला हत्ती बाहेर काढताना माहूताने दिलेला सल्ला व युद्धाची केलेली तयारी व नगारेचा ध्वनी ऐकू आल्यावर त्या हत्तीच्या पूर्व स्मृती जागृत होऊन तो दलदलीतून बाहेर येणे ही सगळीच बाब दैनंदिन जीवनात व्यक्तीला यश प्राप्त करून देणारी आहे. एक प्रकारची प्रेरणा आहे. आपण हे करू शकतो हा सकारात्मक संदेश आहे.
 
कोणतेही काम करताना व त्याची सुरूवात करताना काहीजण आपल्या बाजूने असतील, काहीजण आपल्या बाजूने असणार नाहीत. म्हणून ते काम आपण करावे का न करावे अशी संभ्रम अवस्था निर्माण होते तेव्हा आपण असा विचार करावा की, मी हे काम हाती घेतलेच नसते तर या दोन्ही प्रकारचे विचार प्रवाह आलेच नसते. मग या दोन्ही बाबी विचारात घेऊन मी सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्यास काय हरकत आहे. हा विचार खूपच प्रेरणादायी ठरतो. शेवटी कामाचे यशापयश हे आपल्या वैयक्तीक विचारावर अवलंबून असते. यशाचे सगळेच वाटेकरी असतात परंतु अपयश हे एकटेच असते. त्याच्या एकटेपणावर त्याला आपण साथ दिली तर त्यालाही बळ मिळेल व अपयशाचे यशात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. याचा विचार जीवनातील प्रत्येक बाबतीत मोलाचा असतो. काम करण्याचा हेतू हा त्यातून मला किती सुख मिळणार आहे असा जरूर असावा. परंतु ते सुखाचे शिखर गाठण्यासाठी दुःखाचे अनेक डोंगर ओलांडावे लागणार आहेत याचे भान ठेवून ते करावे. देवापेक्षा कठोर परिश्रमावर भर द्यावा हा लेखकाचा सल्ला लाख मोलाचा वाटतो. शेवटी सुख हे फुलपाखरासारखं असतं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर ते उडून जाते. पाठलाग केला तर ते पकडताना मरून जाते. परंतु शांतपणे आपले काम आपण करीत राहिलो तर ते आपोआप आपल्या मनगटावर येऊन स्थिरावते. याचे भान जो ठेवतो त्याला यशोदेवता माळ घालते.
 
एकंदरित यशोमंत्रा देणार्‍या या तरूण लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एवढ्या कमी वयात जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोनच लेखकाचा भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे दर्शवितो. यशोमंत्राचा जो ध्यास घेईल त्याच्या पदरात जीवनाचा सुंदर घास पडेल याची खात्री वाटते. लेखकाने रंगविलेल्या यशोमंत्रास भरभरून प्रतिसाद वाचकांनी द्यावा आणि त्यामधून आपल्या व इतरांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा. एवढीच माफक अपेक्षा करून थांबतो. लेखक मंगेश विठ्ठल कोळी आणि सदर पुस्तक तमाम वाचकांसाठी उपलब्ध करून देणारे डॉ. सुनील दादा पाटील (कवितासागर प्रकाशन) यांना सदिच्छा!
 
- प्रा. गणपतराव कणसे, कराड - 9421978971
 

वेबदुनिया वर वाचा