पुस्तक परिचय - लहान मुलांच्या विश्वाची सैर घडवणारा कथासंग्रह: सुबोधन

सोमवार, 18 जुलै 2016 (10:47 IST)
आज एक जेष्ठ शिक्षक तसेच वैद्यक शास्त्रातील अनुभव असणारे श्री प्रवीण वैद्यसर यांची भेट झाली. पहिल्याच भेटीत त्यांचे सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व अनुभवण्यास मिळाले. त्यांनी पहिले पुस्तक उदबोधन माझ्या हाती दिले आणि दुस-या म्हणजेच ‘सुबोधन या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यास मला विनंती केली. मी माझे भाग्य समजतो की, अशा वैविध्यपूर्ण, सर्वांगिण विकसित लेखन करणारे तसेच वैचारिक दृष्टीने खूप मोठे स्थान असणारे वैद्यसर यांचे मी खूप आभार मानतो.

सुबोधन हा कथासंग्रह वाचत असताना मला अनेक नवनवीन विषयांचे पैलू जाणवत होते. दैनंदिन जीवनातील प्रसंग की, जे अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करायला लावणारे असतात. असे विचार लेखक प्रवीण वैद्य यांना रेखाटत असताना मुद्दामहूनच कोणत्याही मानवाचा आधार न घेता सर्व कथांमध्ये पशु, पक्षी, प्राण्यांचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा खोलवर विचार करण्यास भाग पाडेल असे चित्र स्पष्ट दिसते. प्रत्येक कथेमध्ये नवनवीन विषय घेतलेले आहेत हे सर्व विषय आज समाजामध्ये अनेक ठिकाणी घातक ठरत आहेत परंतु लेखक वैद्य सरांची प्रत्येक कथा वाचत असता त्या कथेमध्ये पुढे काय होणार याची उत्कंठा वाढवते त्याचा परिणाम म्हणून कोणतीही कथा प्रत्येक जण सुरुवातीपासून ते अगदी शेवट पर्यंत वाचल्याशिवाय शांत होऊ शकणार नाही. कथेतील रंजकता, शब्द रचना त्याचबरोबर शब्द शैलीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

कथासंग्रहातील पहिली कथा मला खूप भावली आहे आणि प्रत्येकाला ती नक्कीच भावेल याची मला खात्री आहे. प्रशंसा खरोखरच आज हा शब्द अनेकांच्या शब्द कोशातून बाहेर पडलेला आहे. कोणीही इतरांची ‘प्रशंसा मनःपूर्वक करताना पहावयास मिळत नाही तेव्हा एक लक्षात ठेवले पाहिजे की, समवयस्क व्यक्तींच्या सानिध्यात राहण्यापेक्षा सम विचारी व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने प्रगती होते. मग तो वयोगट कितीही वेगवेगळ्या प्रकारचा असो त्याला काहीही फरक पडत नाही. समविचारी व्यक्ती या नेहमी एकमेकांच्या मदतीने आणि एकमेकांना प्रोत्साहनपूर्वक, प्रशंसापूर्वक आदर देत असतात. त्यातून मिळणारी ओळख त्याचबरोबर इतरांवर पडणारी सकारात्मक, आदरयुक्त व्यक्तिमत्वाची छाप ही काही वेगळीच असते. अनेक व्यक्ती लहरीपणा अंगी जोपासताना दिसतात या व्यक्ती नेहमी कमी कालावधीसाठी स्वतःची प्रगती करतात. ‘मी म्हणेन तीच पूर्व दिशा, मी सांगेन तसेच झाले पाहिजे’. अशा प्रकारचा अहम् भाव त्यांच्यामध्ये सतत असतो. परंतु हा लहरीपणा सोडून वास्तवतेला जो व्यक्ती स्विकारतो तो खूप दीर्घकाळपर्यंत प्रगती करीत असतो.

कृतघ्न या कथेत लेखकांनी एका वाघाचे चित्रण केले आहे परंतु आज त्या वाघासारखे वागणारे अनेकजण तुम्हाला आपल्या आजुबाजूला वावरत असल्याची स्पष्ट जाणीव होईल आणि ज्या प्रकारे कथेचा शेवट होतो त्याच प्रकारे अनेक व्यक्तींचा देखील होत असताना आपणास पहावयास मिळतो आहे. ‘आत्मघात ही कथा तर अगदीच मानवाच्या वर्तणुकीला साजेशी कथा आहे. भारुंड नावाचा पक्षी देह एकच परंतु मुख दोन असणा-या पक्षाचे वर्णन लेखकाने केले आहे. आज समाजात विशेषतः ज्या व्यक्ती नेहमी राजकारण करत असतात मग ते स्वतःचे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा असतील त्यांच्याशी सुद्धा ते या भारुंड पक्षाप्रमाणे वागतात आणि इतरांच्या बरोबर स्वतःचाही सर्वनाश करून घेतात.

स्वजनद्रोह ही कथा वाचत असताना प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, रावण आणि बिभीषण यांची घडलेली कथाच डोळ्यासमोर उभी ठाकते कारण रावणाने मरते वेळी एक गोष्ट सांगितली की, रावणासारख्या व्यक्तींच्यामध्ये राहून सुद्धा बिभीषण कधी ही वाईट वागला नाही आणि कैकयी त्याची बहीण तुमच्या सारख्यांच्या सानिध्यात राहून सुद्धा सुधारली नाही. कठीणातील कठीण प्रसंगी आपल्या सोबत स्वतःची हक्काची माणसे बरोबर असतील तर आपण त्यातून सहजरीत्या बाहेर पडू शकतो परंतु स्वजनद्रोहाने आपण एकटे सामोरे जावू शकत नाही हे मात्र त्रिवार सत्य वचन आहे.

सुबोधन कथासंग्रहामधील खरे भाग्यवंत कोण?, महत्वाकांक्षा, संगती, कुंपमंडुक, वल्गना, प्रादुर्भाव, ऋणानुबंध यातून मानवाच्या अंगी असणारे गुणावगुण विशेषतः पशुपक्षी आणि प्राणांच्या उदाहरणातून भ्रम, कुपमंडुक वृत्ती, धाडशी वृत्ती, धूर्त वृत्ती या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यासपूर्ण आणि साध्या सोप्या शब्दांत वर्णन केले आहे. लेखकांच्या विजयध्वजा या कथेमधून मानवाला लाजिरवाणे वाटावे अशा सर्व बाबी त्यांनी स्पष्टपणे मांडल्या आहेत. एकूणच या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतून मानवाने स्वतः खूप काही शिकण्यासारखे आहे. ‘सुबोधन कथासंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचावा. या कथासंग्रहाचे लेखक श्री. प्रवीण वैद्यसर यांचे मी विशेष आभार मानतो आणि या कथा पुस्तक रुपाने सर्वांच्या हाती देणारे ‘कवितासागर प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांचे मी खूप खूप आभार मानतो या दोघांनाही पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

- मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) ९०२८७१३८२०

वेबदुनिया वर वाचा