पुस्तक, ई-बुक रूपातील ‘उदबोधन’ कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (10:55 IST)
जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणाद्वारा पश्चिम महाराष्ट्रातील मातीत सजलेला साहित्य सुगंध जगभर पसरविण्याचा प्रयत्न करणारे जयसिंगपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य यांच्या ‘उदबोधन’ या कथासंग्रहाचे पुस्तक आणि ई-बुक अशा द्विविध रूपात प्रकाशन होणार आहे. ‘उदबोधन’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सांगलीचे धर्मादाय आयुक्त मा. श्री. महावीर जोगी यांच्या शुभहस्ते बाहुबली विद्यापीठ, बाहुबली येथे रविवारी (७ ऑगस्ट २०१६) परम पूज्य संमतभद्र महाराज यांच्या २८व्या पुण्यतिथी समारोहात पूज्य ज्ञानमती माताजी व पूज्य श्रुतमती माताजी यांच्या मंगल सानिध्यात संपन्न होत आहे. साहित्यिक प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
कवितासागर पब्लिकेशन, जयसिंगपूरतर्फे प्रकाशित ‘उदबोधन’ कथासंग्रहास ज्येष्ठ समीक्षक भूपाल भाऊ गुरव यांची प्रस्तावना लाभली असून त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखविले आहे. पुस्तकातील व्यक्तिचित्रणे व कथानके यावर भाष्य करतांनाच समीक्षक भूपाल भाऊ गुरव यांनी  मराठी  साहित्यातील  दीर्घकथा,  कादंबरी या क्षेत्राकडे तरुणांनी वळावे असे आवाहन केले.  
 
‘उदबोधन’ हा वाचकांना सहज समजेल असा रंजक कथासंग्रह आहे. ‘उदबोधन’ मध्ये सतरा लघुकथा असून प्रत्येक कथेतून तात्पर्य देण्यात आले आहे. यातील काही कथा मासिक सन्मती, मासिक महापुरूष, साप्ताहिक प्रगत हिंदुस्थान, दैनिक बंधुता, साप्ताहिक कवितासागर इत्यादी मधून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या आहेत. 
 
रविवारी सकाळी ९ वाजता बाहुबली विद्यापीठ, बाहुबली येथे होत असलेल्या या कार्यक्रमास सर्व साहित्य रसिकांनी व कथा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैद्य कुटुंबीय व कवितासागर पब्लिकेशनच्या सौ. संजीवनी सुनील पाटील यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा