वरुण धवनला झालेला 'व्हेस्टिब्यूलर हायपोफंक्शन' रोग आहे तरी काय?
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (16:56 IST)
अभिनेता वरुण धवनने इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या मुलाखत त्याला व्हेस्टिब्यूलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाल्याचं म्हटलं होतं. वरुणने यासंदर्भात सविस्तर ट्वीट करून माहिती दिली आहे.
वरुणने लिहिलं आहे, "मित्रांना काही दिवसांपूर्वी मी एक मुलाखत दिली ज्यामध्ये तब्येत बरी नसल्याचं म्हटलं होतं. हे कळल्यावर तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने विचारपूस केलीत. तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. तुमच्या सदिच्छांमुळे मी 100 टक्के बरा होऊन परतेन याची खात्री वाटते. योगा, स्विमिंग, फिजिओ आणि जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे माझी तब्येत सुधारते आहे. सूर्यप्रकाश मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. देवाची कृपा आहे."
इंडिया टुडे मुलाखतीत बोलताना वरुण म्हणाला होता, "मी एकदम मिटूनच गेलो. काय झालं नेमकं ते मला कळलंच नाही. व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार मला झाला आहे. यामध्ये तुमच्या शरीराचं संतुलन जातं.
पण मी या आजाराला परतावून लावण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे. दैनंदिन जीवनात आपण सगळे शर्यतीत धावत आहोत, कोणीही आपण का धावतोय याचा विचार करत नाही. यापेक्षा उदात्त कारणांसाठी आपण आहोत. मी इथे का आहे, माझं उद्दिष्ट काय असावं यावर काम करतो आहे. लोकांना आपापलं निमित्त सापडेल.
कूली नंबर1 चित्रपटात सारा अली खानच्या बरोबरीने काम केलं होतं. जुग जुग जियो हा त्याचा अलीकडे प्रदर्शित झालेला चित्रपट. येत्या काही महिन्यात त्याचा भेडियो चित्रपट प्रदर्शित होतो आहे. बवाल नावाच्या चित्रपटात तो जान्हवी कपूरच्या बरोबरीने दिसणार आहे. कोरोना नंतर काम करू लागणं आव्हानात्मक होतं असं वरुणने सांगितलं होतं.
काय असतो व्हेस्टीब्युलर हायपोफंक्शन?
कानातल्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या बिघाडामुळे हा आजार होतो. कानाच्या आत एक द्रव पदार्थ असतो. त्याच्या अवतीभवती हाडांचं आणि मासांचं जंजाळ असतो. कानाच्या या आतल्या भागात असंतुलन झाल्यावर हा रोग होतो.
हालचालीनुसार कानातला द्रव हलतो. कानातला सेन्सर शरीरातल्या बदललेल्या घडामोडींबाबत मेंदूला संदेश पाठवतो. त्यानुसार शरीराचं संतुलन राखलं जातं.
संसर्ग, रक्ताची गुठळी, अपघात यामुळे हा सेन्सर काम करायचा थांबतो आणि मेंदूला बिघाड झाल्याचा संदेश जातो. या स्थितीमुळे थकवा, चक्कर असा त्रास होतो. उभं राहिल्यानंतर संतुलन ढासळू शकतं आणि माणूस पडूही शकतो.
मेंदूत रक्ताच्या गुठळ्या, डोक्याला झालेला अपघात यामुळे ही स्थिती उद्भवू शकते. 30 ते 50 वयोगटादरम्यान हा त्रास होऊ शकतो. धुरकट किंवा धूसर दिसणं, चक्कर येऊन अस्वस्थ वाटणे, संतुलन राखणं अवघड होणं ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
तोल जातोय असं वाटत असल्याने आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. बाहेर जाण्यायेण्यावर मर्यादा येऊ शकते. आजार किती गंभीर आहे यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून आहे.
वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो. हा जीवघेणा आजार नाही पण संतुलनावर परिणाम होत असल्याने माणसाला अस्वस्थ वाटू शकतं आणि रोजचं दैनंदिन जगणंही त्रासदायक होऊ शकतं.