शाहरुख खानच्या डंकी चित्रपटात दाखवलेला डॉंकी रूट काय आहे?
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (08:48 IST)
डंकी, धुनकी, दुनकी, दणकी... शाहरुख खान आणि राजू हिरानींच्या या फिल्मच्या नावावरून खूप मजा सुरू होती. तर या फिल्मचं खरं नाव आहे डंकी.
बेकायदेशीर पद्धतीने भारतातून लंडनला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहे असं स्वतः शाहरुख खानने सांगितलंय.
अशा पद्धतीने परदेशात जाण्याला डाँकी रूट म्हणतात. त्यासाठीच पंजाबमध्ये डंकी हा शब्द प्रचलित आहे.
भारतातून अमेरिका किंवा इतर देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्या बेकायदेशीर मार्गांचा वापर केला जातो?
मुळात पंजाब, हरियाणा आणि गुजरातमधील लोक या मार्गाने परदेशात का जातात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे यातले धोके काय आहेत? हा जाणून घ्यायलाच हवं.
डाँकी रूट म्हणजे नेमकं काय?
डंकी हा एक पंजाबी शब्द आहे. स्वतःच्या देशातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे बाहेर पडून दुसऱ्या देशात प्रवेश करण्याच्या या मार्गालाच डाँकी रूट म्हटलं जातं.
आधी पंजाब, हरियाणामधून अशा पद्धतीने अमेरिकेला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त होतं पण अलीकडच्या काळात गुजरातमधूनही लोकांनी डाँकीरूट्सचा वापर केल्याची माहिती आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.
वेगवेगळ्या देशांमध्ये थांबे घेत अखेर तुम्हाला पोहोचायचं त्या देशात प्रवेश करायचा आणि तिथे जाऊन आश्रय मिळवायचा अशी ही पद्धत आहे. पण यात अनेक धोके आणि अडचणी आहेत.
'डाँकी फ्लाइट हा शब्द आता एका दशकापेक्षा अधिक काळ प्रचलित आहे, जो आता मार्गांसंदर्भातही वापरला जातो.
पंजाबमधील पत्रकार दलीप सिंग यांच्या मते, "खेचरं त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी रस्त्यावरून भटकतात, त्यामुळे परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी 'गाढव' हा शब्द स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाला, जो नंतर प्रसारमाध्यमांमध्येही वापरला जाऊ लागला."
एकेकाळी प्रादेशिक किंवा राष्ट्रीय वृत्तपत्रांपुरता मर्यादित असलेला हा शब्द, वॉशिंग्टन डीसी येथील मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट (डॉंकी फ्लाइट्स, फेब्रु-2014, पृष्ठ क्रमांक 2) द्वारे वापरला गेल्यानंतर हा शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालाय.
परदेशात जाण्याचे डाँकी रूट कोणते आहेत?
लॅटिन अमेरिकतल्या एल साल्वाडोर, गयाना, इक्वेडोर, बोलिव्हिया अशा देशांमध्ये जाणं भारतीय नागरिकांसाठी तसं सोपं आहे. यापैकी अनेक देश भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल देतात.
ब्राझील, व्हेनेझुएला, कोलंबिया या देशांचीही व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. त्यामुळे डाँकीरूट्सच्या प्रवासाचा पहिला टप्पा इथूनच सुरू होतो.
बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेणाऱ्या एजंट्सचे कोणत्या देशातील मानवी तस्करांशी संबंध आहे यावरून डाँकी रूट कसा असेल ते ठरतं. लॅटिन अमेरिकेतील देशात जाण्यासाठी देखील काही महिने वाट बघावी लागू शकते.
एकदा या देशांमध्ये पोहोचल्यानंतर एजंट्स तुम्हाला तिथून कोलंबियाला पोहोचवतात. कोलंबियाचं नाव एरव्ही तुम्ही तिथल्या कुप्रसिद्ध ड्रग्स व्यापरासाठी ऐकलं असेल.
त्यानंतर कोलंबिया आणि पनामाला जोडणाऱ्या डॅरियन गॅपच्या अत्यंत धोकादायक जंगलातून पायी प्रवास करावा लागतो. हे जंगल पार करण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात.
तिथे जंगली प्राण्यांचा धोका असतो, या प्रवासादरम्यान एकही गाव लागत नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ज्या गुन्हेगारी टोळ्या तुम्हाला घेऊन जातात त्याही अत्यंत धोकादायक असतात.
ज्या लोकांना या जंगलाचा प्रवास टाळायचा असेल ते जास्त पैसे खर्च करून थेट मेक्सिकोला पोहोचतात. मेक्सिको आणि अमेरिकेदरम्यान सुमारे 3,140 किलोमीटर लांब पसरलेली सीमारेषा आहे आणि तिथून अमेरिकेत जाणं तुलनेने सोपं आहे.
डाँकी रूट : खर्च धोके आणि प्रसार
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाने प्रवास करताना साधारण 15 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात.
मात्र कधी-कधी यासाठी 70 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. काही एजंन्ट्स अधिक पैशांच्या बदल्यात कमी अडचणीच्या प्रवासाचं आश्वासन देतात. थोडक्यात, प्रवासात धोका जेवढा जास्त, तेवढे पैसे कमी असं ते एकूण गणित असतं.
याशिवाय अमली पदार्थांची तस्करी करणारे गट, वाटेतल्या देशांचे भ्रष्ट अधिकारी आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या इतर अनपेक्षित खर्चासाठी पैसे तयार ठेवावे लागतात.
इमिग्रेशन व्यवसायातील एका एजंटने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "अमेरिकेत जाण्यासाठी कोणता आणि काय मार्ग निवडायचा हे एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर अवलंबून असतं.
"त्याचं वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, खर्च करण्याची क्षमता, जोखीम घेण्याची क्षमता, शारीरिक तंदुरुस्ती इ. क्षमतेनुसार त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्यायाची निवड केली जाते.
"काही अर्जदारांना अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि तिथे काम करायचंय, तर काहींना शिकत असताना कमवायचंय.
"शंभर टक्के उपस्थितीच्या कडक नियमांमुळे अशा लोकांना अंधाऱ्या आणि कुठल्यातरी काना-कोपऱ्यात असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी तयार केलं जातं. याशिवाय कॅनेडियन आणि मेक्सिकनच्या सीमादेखील बेकायदेशीर प्रवेशासाठी प्रचलित आहेत," असं एजंटने सांगतिलं.
मग तरीही हा मार्ग का निवडला जातो? ज्येष्ठ पत्रकार हितेंद्र राव यांनी बीबीसीला सांगितलं की, "पंजाब, हरियाणा या राज्यातल्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत.
"पंजाबमध्ये राहणाऱ्या अनेकांचे नातेवाईक अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये जातात. तिथे गेलेल्या लोकांचं आभासी आयुष्य बघून लोकांना तिकडे जायची इच्छा होते.
"विशेष म्हणजे एखाद्या देशात आश्रय घेतल्यानंतर तुम्ही तिथून परत मायदेशी येऊ शकत नाही तरीही लोक तिकडे जातात. आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी आणि अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अशा तीन कारणांमुळे बहुतांश तरुण डाँकी रूट्सचा वापर करतात," राव सांगतात.
अमेरिकेत आश्रय मिळवण्याची प्रक्रिया काय आहे?
अमेरिकेत पोहोचलेल्या निर्वासितांसाठी तिथे गेल्यानंतर सरकारी आश्रय मिळवणं गरजेचं असतं.
याबाबत हितेंद्र राव यांनी सांगितलं की, "आश्रय मिळवण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. तुमच्या मायदेशात जर तुमचा छळ होत असेल, वांशिक किंवा धार्मिक कारणांवरून तुमच्यासोबत भेदभाव होत असेल, तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही अमेरिकेत आश्रय मागू शकता.
"यासाठी अमेरिकेने तिथे असायलम ऑफिसर नियुक्त केलेले असतात. हे अधिकारी तुमची मुलाखत घेऊन तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे ठरवतात.
"त्यानंतर तुम्हाला एका न्यायालयात हजर केलं जातं आणि तिथे न्यायाधीश तुम्हाला अधिकृत आश्रय मिळेल की नाही याचा अंतिम निर्णय घेतात," राव सांगतात.
म्हणजे काहीतरी करून बेकायदेशीर मार्गाने तुम्ही परदेशात पोहोचलात तरी तिथे तुम्हाला मुक्काम करता येईल याची शाश्वती नाही.
परदेशातलं ऐशआरामाच्या जीवनशैलीबद्दलच्या कल्पनांनी अनेक तरुण जीव धोक्यात घालून हा मार्ग पत्करतात पण यात आर्थित फसवणूक आणि प्रसंगी जीवाचाही धोका असतो हे विसरून चालणार नाही.