मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा गायक सोनू निगम याच्या वडिलांच्या घरी चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरीला गेलेली रक्कम सत्तर लाख आहे. सोनू निगमच्या बहिणीने त्यांच्या वडिलांच्या मुंबईच्या घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ही चोरी त्यांच्या आधीच्या ड्रायव्हरने केली असल्याचं कळलं.
सोनू निगमचे वडील अगमकुमार (वय 72) हे मुंबईतील ओशिवरा, अंधेरी पश्चिम परिसरात राहतात. या घरातून ही चोरी 19 आणि 20 मार्च दरम्यान झाली होती. सोनू निगम यांची बहीण निकिता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार केली दाखल होती. तक्रारीनुसार सोनू निगमच्या वडिलांकडे रेहान नावाचा ड्रायव्हर आठ महिने काम करत होता. परंतु त्याचं काम चोख नसल्याने सोनू निगमच्या वडिलांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं.
रविवारी दुपारी 20 मार्च रोजी सोनू निगमचे वडील निकिताच्या घरी वर्सोवा येथे गेले होते. संध्याकाळी तिथून परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या डिजिटल लॉकरमधून 40 लाखांची रक्कम चोरीला गेली होती. ही गोष्ट त्यांनी लगेच फोन करून त्यांच्या मुलीच्या कानावर घातली. तर दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मुलाच्या घरी 7 बंगला येथे व्हिसा संदर्भातील कामासाठी गेले होते. तिथून सायंकाळी परत आल्यावर त्यांच्या लॉकरमधून आणखीन 32 लाख गायब झाले होते. त्या लॉकरचं कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांचा आधीचा ड्रायव्हर रेहान हातात बॅग घेऊन दोन्ही दिवस ते घरी नसताना त्यांच्या घराकडे जाताना दिसला. डुप्लिकेट चावी वापरून त्यांच्या घरी घुसून चोरी केली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
सोनू निगमच्या वडिलांचा त्याच्यावर संशय होता. ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात रेहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी रेहानला अटक केली आहे.
आपल्या गायनाने सर्वांना वेड लावणाऱ्या सोनू निगमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोनू हा आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण सोनू निगम हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनूने गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.
Edited by : Ratnadeep Ranshoor