एमएस धोनी चित्रपटाचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput)ने वांद्रेच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तपासासाठी मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. सुशांतच्या नोकराने त्याच्या आत्महत्येविषयी पोलिसांना माहिती दिली.
सुशांतसिंग राजपूत याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात टेलिव्हिजन जगात अभिनेता म्हणून केली होती. सुशांताने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये टीव्ही सीरियल 'किस देश में है मेरा दिल' पासून केली होती. पण 'पवित्र रिश्ता' या मालिकांद्वारे त्याला खर्या अर्थाने ओळखले गेले. जीटीव्हीवर पवित्र रिश्ता सीरियलमध्ये सुशांत अंकिता लोखंडे यांच्यासमवेत दिसला. या दोघांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते.
टीव्हीवर पदार्पण करणार्या सुशांतसिंग राजपूतने आलिकडच्या वर्षांत मोठ्या पडद्यावर आपली उल्लेखनीय उपस्थिती दर्शविली होती. सुशांतने डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी, काय पो छे आणि छिछोरे अशा काही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी फिल्म सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दीचा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे.