श्रीदेवीचा मृत्यू डाएटिंग आणि मीठ सोडल्यामुळे? बोनी कपूर यांनी काय सांगितलं?
बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (22:40 IST)
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू आजही अनेकांसाठी गूढ आहे. मात्र त्यांचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी एक मुलाखती दरम्यान त्यांच्या मृत्यूमागचं कारण सांगितलं आहे.
लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री श्रीदेवी या दुबईमध्ये एका लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या.
तिथेच एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे तेव्हा आरोप झाले होते. पण पाच वर्षानंतरही श्रीदेवींच्या मृत्यू मागचं खरं कारण काय? याबद्दल चर्चा रंगताना दिसतात.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले की, "दुबईच्या अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी तिचा मृत्यू बुडून झालाय यावर जोर दिला. मात्र तिच्या मृत्यूसाठी तिचं डाएटही जबाबदार होतं."
'द न्यू इंडियन' ला दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी श्रीदेवींच्या सवयींविषयी, त्यांच्या निधनाबद्दल काही गोष्टी सांगितल्यात. ते म्हणाले की, "श्रीदेवींचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तो एक अपघाती मृत्यू होता. तिच्या निधनानंतर मला अनेक आरोपांना सामोरं जावं लागलंय."
मुलाखती दरम्यान त्यांनी म्हटलं की, की, श्रीदेवींचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तो एक अपघाती मृत्यू होता. शवविच्छेदन होईपर्यंतच्या 24 ते 48 तासांपर्यंत यावर बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं.
"दुबईतले अधिकारी म्हणाले की,आम्हाला हे करावं लागतंय कारण आमच्यावर भारतीय मीडियाचा प्रचंड दबाव आहे. आणि त्यांनाही माहीत होतं की हा घातपात नाहीये. मला लाय डिटेक्टर चाचणीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आलेला अहवाल स्पष्टपणे सांगतो की हा अपघाती मृत्यू होता."
ती मीठ खात नव्हती. त्यामुळे अनेकदा तिला चक्कर यायची, असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, "कोणीही आयुष्यात जेवणात मीठ खाणं सोडू नये. मीठ टाळल्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडू शकता. श्रीदेवीच्या बाबतीतही हेच घडलं. ती बेशुद्ध पडली आणि तिचा एक दात तुटला."
बोनी कपूर यांनी सांगितलं की, "स्क्रिनवर छान दिसावं म्हणून ती डाएट करत होती. ती स्ट्रिक्ट डाएटवर होती. तिला भूक लागायची, पण ती डाएट करून उपाशी राहायची.
जेवणात मीठ घेत नव्हती त्यामुळं अनेकदा तिला भोवळ यायची. माझं लग्न झाल्यापासून अनेकदा तिला ब्लॅकआउटचा त्रास झाला होता. डॉक्टरांनीही तिला अनेकदा लो बीपीचा त्रास असल्याचं सांगितलं होतं."
बोनी कपूर म्हणाले, "बहुतेक महिलांना वाटतं की मीठ खाल्लं की आपण जाड होतो. पण मी त्यांनाही सांगेन की मीठ पूर्णपणे सोडू नका. मी म्हणेन की, सॅलड खातानाही त्यावर थोडं मीठ टाका."
"श्रीदेवी यांनी त्यांचं वजन 45 ते 46 किलो इतकं कमी केलं होतं. 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात त्यांनी कमी केलेलं वजन सहज जाणवतं."
बाथरुममध्ये पडून दात तुटले
बोनी कपूर यांनी सांगितलं की, "श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अभिनेते नागार्जुन शोक व्यक्त करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, माझ्यासोबत शूटिंग करत असताना श्रीदेवी क्रॅश डाएट करत होत्या."
"श्रीदेवींच्या निधनामुळे पंकज पराशरचा एक चित्रपट अपूर्ण राहिला. नागार्जुनने जे काही सांगितलं ते मला त्याआधी माहीत नव्हतं. पण मला पराशरच्या चित्रपटाविषयी माहिती होती. मी श्रीदेवीला 'ते कर' असं म्हटलं नव्हतं, पण तिने स्ट्रिक्ट डाएट केलं, मीठ सोडलं."
त्यांनी पुढे सांगितलं की, "आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला मीठ सोडू नका असं म्हटलं होतं. किंबहुना मी देखील तिला तेच सांगितलं होतं. जेवणाच्या टेबलावर 'मीठ नसलेलं सूप' आणि 'मीठ नसलेलं जेवण' बघून मी विनोदही करायचो. पण तिने आमचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही आणि शेवटी ही वाईट घटना घडली."
मीठ सोडल्यामुळे काय होतं?
याविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने डॉ. मंझर नसीम यांच्याशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सांगितलं की,"शरीरात मीठाची कमतरता किंवा सोडियमची तीव्र कमतरता असेल तर ब्लॅकआउट सारख्या घटना घडू शकतात. पण यामुळे मृत्यू होऊ शकतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही."
मात्र स्ट्रिक्ट डाएट किंवा केटो डाएटबद्दल त्यांनी सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये, बंगाली चित्रपट अभिनेत्री मिष्टी मुखर्जी यांचा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या प्रतिनिधीने सांगितलं की, केटो डाएटमुळे तिची मूत्रपिंड निकामी झाली.
ते सांगतात, "जेव्हा मी एखाद्या मित्राला किंवा त्याच्या पत्नीला भेटतो तेव्हा मी त्यांना रक्तदाब तपासायला सांगतो. ते डाएट करत असतील तर त्यांना त्याचा अतिरेक करू नका असं सांगतो. कारण आपलं आरोग्य आपल्या हातात आहे."
तमिळनाडूमध्ये 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवींचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून दाक्षिणात्य सिनेमांमधून काम केलेल्या श्रीदेवी यांनी 1978 मध्ये 'सोलवा सावन' या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
2020 मध्ये रिलीज झालेला 'मॉम' हा त्यांचा 300 वा चित्रपट होता. 1986 मध्ये त्यांचे दहा चित्रपट फक्त हिंदीत प्रदर्शित झाले. त्या एका वर्षात त्यांनी डझनाहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
'चालबाज' या चित्रपटासाठी त्यांना प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पण त्याआधी त्यांनी तमिळ चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार पटकावले होते.
'चांदनी', 'लम्हें', 'मिस्टर इंडिया', 'खुदा गवाह', 'सदमा' आणि 'नगीना' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले.
श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. त्यांना खुशी आणि जान्हवी कपूर या दोन मुली आहेत. जान्हवी कपूर स्वतः एक अभिनेत्री आहे.
2013 साली श्रीदेवी यांना 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांना पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
90 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. पुढे 2012 मध्ये इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून त्यांनी दमदार पुनरागमन केलं होतं.