गायिका अलका याज्ञनिक यांना 'अचानक बहिरेपणा', हा आजार नेमका काय आहे?

मंगळवार, 18 जून 2024 (19:26 IST)
प्रसिद्ध गायिका अलका याज्ञनिक यांनी त्यांच्या तब्येतीविषयी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे महत्त्वाची माहिती सांगितली आहे. व्हायरल अटॅकमुळे आपल्याला बहिरेपण आल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय.
 
फॅन्स, फॉलोअर्स आणि मित्रमंडळींना उद्देशून लिहिलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अलका याज्ञिक म्हणतात, "काही आठवड्यांपूर्वी विमानातून बाहेर पडत असताना मला अचानक जाणवलं की मला काहीच ऐकू येत नाहीये. या घटनेनंतरच्या काही आठवड्यांमध्ये बराच धीर एकवटल्यानंतर आता मला मौन सोडायचंय. इतके दिवस मी काही करताना दिसत का नाही याची चौकशी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमंडळी आणि सदिच्छकांना यामागचं कारण मला सांगायचं आहे."
 
असं सांगत अलका याज्ञनिक यांनी पुढे म्हटलंय की, "मला अतिशय दुर्मिळ असा सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस (Sensoryneural nerve hearing loss) झाल्याचं निदान माझ्या डॉक्टरांनी केलं आहे. व्हायरल अटॅकमुळे हे होते."
"मी अगदी बेसावध असताना हा इतका मोठा धक्का अचानक बसला. मी अजूनही परिस्थिती समजून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. त्यामुळे माझ्यासाठी प्रार्थना करा. माझे फॅन्स आणि तरूण सहकाऱ्यांना मला अतिशय मोठ्याने वाजणारं संगीत आणि हेडफोन्स यांविषयी खबरदारीचा इशारा द्यायचा आहे. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात आरोग्याला असणाऱ्या धोक्यांविषयी कधीतरी लिहिण्याची मला इच्छा आहे," असंही अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
त्यांनी पुढे लिहिलंय की, "तुमचं प्रेम आणि पाठिंबा यांच्या मदतीने नवीन आयुष्याशी जुळवून घेण्याची आणि तुमच्यापर्यंत परत येण्याची मला आशा आहे. या कठीण प्रसंगात तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा माझ्यासाठी मोलाचा आहे."
 
सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे काय?
अमेरिकन स्पीच लँग्वेज हिंगरिंग असोसिएशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार कानाच्या आतल्या बाजूस इजा वा दुखापत झाल्यास अशाप्रकारचा सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस होतो. कानाच्या आतल्या भागात असणाऱ्या नर्व्ह - नसांमध्ये अडथळा आल्याने मेंदूसोबतच्या संपर्कात अडथळे येतात. काहींसाठी यामुळे क्षीण आवाज ऐकणं कठीण होतं. तर अनेकदा मोठे आवाज अस्पष्ट वा दबल्यासारखेही ऐकू येतात.
 
अशा प्रकारचं बधीरपण हे बहुतेकदा कायम स्वरूपी असून त्यावर औषधं वा शस्त्रक्रिया परिणामकारक ठरत नाहीत. अशा प्रकारच्या बधीरतेसाठी हिअरिंग एड (Hearing Aid) म्हणजे श्रवणयंत्राची मदत घेता येऊ शकते.
 
आजारपण, अनुवंशिकता, वाढतं वय, डोक्याला जोराचा मार लागणं, कानाच्या आतल्या बाजूच्या रचनेमध्ये त्रास होणं वा मोठे आवाज वा स्फोट ऐकणं यामुळे अशा प्रकारचं बधीरपण येण्याची शक्यता असते.
 
हा आजार कशामुळे होऊ शकतो?
या आजाराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही ईएनटी स्पेशालिस्ट (कान-नाक-घसारोग तज्ज्ञ) डॉ. नीता घाटे यांच्याशी संपर्क साधला.
 
त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हटलं की, सर्वांत आधी आपण कानाची रचना समजून घेऊया. कानाचे तीन भाग आहेत.
 
बाहेरचा कान म्हणजे कर्णा, इयर कनाल (ear canal) आणि कानाचा पडदा.
मधला कान कानाच्या पडद्यापासून सुरू होऊन तीन हाडांची साखळी, घण, ऐरण व रिकीब.
आतल्या कानामध्ये sensory hair cells आणि ऐकायची नस असते, जी मेंदूपर्यंत जाते.
जेव्हा आवाज होतो, तेव्हा ध्वनीलहरी निर्माण होतात आणि कानाच्या पडद्यामध्ये कंपनं निर्माण होतात. हाडांच्या साखळीमार्फत ती कंपनं आतल्या कानापर्यंत पोहोचतात आणि त्याचे रुपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होऊन ते मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ऐकू येतं.”
 
यामध्ये जेव्हा आतल्या कानाच्या पेशीला किंवा नसांना इजा झाल्यामुळे जे बहिरेपण येतं त्याला सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलं.
डॉ. नीता यांनी अशाप्रकारच्या बहिरेपणाची वेगवेगळी कारणं सांगितली.
 
कधीकधी बहिरेपण अनुवंशिक असतं.
इन्फेक्शनमुळे सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो. विशेषतः व्हायरल इन्फेक्शनमुळे कधीकधी अशा प्रकारचा अचानक बहिरेपणा येऊ शकतो.
गरोदरपणात आईचं वाढलेलं ब्लड प्रेशर असेल, काही इन्फेक्शन झाले असतील (उदाहरणार्थ- गोवर-कांजिण्या) प्रसूतीदरम्यान अडचणी आल्या असतील तर नवजात बाळाला बहिरेपण येऊ शकतं.
खूप आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो.
वयोमानाप्रमाणेही ऐकण्याच्या नसांची क्षमता कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो.
जंतुसंसर्ग, अपघात
या बरोबरच गेल्या काही वर्षांतल्या मानवनिर्मित कारणांमुळेही सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो.
 
ध्वनीप्रदूषण
मोठ्या आवाजात गाणी लावणं
सतत इअरफोन्स लावून ऐकल्यामुळे कानांवर परिणाम होऊ शकतो. ट्रेन, बसमध्ये, रस्त्यावर चालताना तुम्ही एअरफोन्स लावता, तेव्हा आधीच आजूबाजूला गोंगाट असतो. त्यात तुम्ही अजून मोठा आवाज करून गोष्टी ऐकता. त्याचा ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
काय काळजी घ्यायला हवी?
ऐकण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी काय दक्षता घ्यायला हवी, कोणती खबरदारी बाळगायला हवी, याबद्दलही आम्ही डॉ. नीता यांना विचारलं.
 
त्यांनी म्हटलं की, “आपल्याला एका कानानं कमी ऐकू येत असल्याचं सहसा लक्षात येत नाही कारण आपला दुसरा कान नीट असतो. त्यामुळेच सर्वांत प्रथम ऐकण्याच्या बाबतीत काहीही समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने डॉक्टरांकडे जायला हवं. तिथे ऐकण्याच्या क्षमतेच्या काही चाचण्या केल्या जातात आणि त्यानुसार किती अपाय झाला आहे, त्यावर काय उपचार करता येणं शक्य आहे हे पाहिलं जातं.”
ऐकायला कमी येत असल्याच्या लक्षणांकडे आपण स्वतः आणि घरातल्यांनी दुर्लक्ष करू नये, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. म्हणजेच जर घरातील एखादी व्यक्ती सतत मोठ्याने टीव्ही लावत असेल, तर त्याला काही समस्या आहे का याचा विचार करायला हवा.
 
ऐकायला कमी येत असल्याचं दुसरं लक्षण म्हणजे अशा व्यक्तीला ध्वनी ऐकू येतात, पण शब्द नीट कळत नाहीत. तसंच गोंगाटामध्ये स्पष्ट ऐकू येत नाही. गुणगुणल्यासारखे, इंजिनसारखे, खरखरसारखे आवाज येतात.
 
या सगळ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता सतत सावध राहायला हवं असं डॉ. नीता घाटे यांनी आवर्जून सांगितलं. कारण वेळेत गोष्टी कळल्या तरच उपचारांची दिशा ठरवता येऊ शकते, असं त्यांनी म्हटलं.

Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती