सर्वांनाच सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद माहिती असून बॉलीवूडमधील वाद जास्त दिवस टिकत नाहीत याचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे. आपले भांडण विसरून हे दोघेही एका मराठी चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. रितेश देशमुखच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात हे दोघेही एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
सलमान खान एक छोटी भूमिका रितेश देशमुखच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. सलमानने याआधीही रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. आता पुन्हा सलमान मराठी चित्रपटात झळकणार आहे. तर आता विवेक ओबेरॉय हा सुद्धा या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटात दोघेही एकत्र एका सीनमध्ये समोरासमोर येणार नाही तर त्यांचे वेगवेगळे शूट होणार आहे. मात्र, या निमित्ताने का होईना, दोघेही एका चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.