रणबीर-आलियाची लग्नघटिका समीप, मेहंदी-हळदी समारंभानंतर विवाहसोहळा

गुरूवार, 14 एप्रिल 2022 (11:35 IST)
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (14 एप्रिल) लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्याचा महत्त्वाचा भाग असलेला हळदी समारंभ काल पार पडला आहे.
 
रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी हे स्पष्ट केलं आहे. लग्नासाठी रणबीर आणि आलिया यांचं मुंबईतील पाली हिलस्थित वास्तू बिल्डिंगला फुलांनी सजवण्यात आलं आहे.
 
रणबीरचा बंगला कृष्णा राज जिथं स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षं राहत होते, त्याचं डागडुजीचं काम सध्या सुरू आहे. पण, या बंगल्यापासून रणबीर आणि आलिया यांच्या नव्या वास्तू बंगल्यापर्यंत रोषणाई करण्यात आली आहे.
 
रणबीर कपूरची वरात कृष्णा राज बंगल्यापासून वास्तूपर्यंत आणली जाईल, असं सांगितलं जात आहे. या दोन्ही घरांदरम्यान असलेला रस्ता एखाद्या सणासारखा सजवण्यात आला आहे.
 
'आलिया आमच्यासाठी सर्वोत्तम भेट'
आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाविषयी कपूर कुटुंबीय आधी काहीही बोलायला तयार नव्हतं. पण आता नीतू कपूर यांनी म्हटलंय की, आलिया आमच्यासाठी सर्वोत्तम भेट आहे. देव त्या दोघांना नेहमी आनंदी ठेवो.
 
रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहिनीनं म्हटलं की, आलिया खूप क्यूट मुलगी आहे. सुंदर बाहुलीसारखी आहे.
 
हळद लागली...
रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नसोहळ्याची तयारी केली आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि दाजी भारत साहनी दिल्लीहून मुंबईला पोहोचले.
 
लग्नसोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. कपूर कुटुंबीयांच्या वांद्रेस्थित पाली हिल परिसरातल्या घरी पूजा आहे. या बिल्डिंगमध्ये रणबीर आठव्या मजल्यावर तर आलिया पाचव्या मजल्यावर राहते.
 
पूजेला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. सुमारे तासभर ही पूजा चालली. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम झाला. मेहंदीनंतर हळद आणि संगीत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रणबीचे काका रणधीर कपूर यांच्या मुली करिश्मा कपूर, आणि करीना कपूर उपस्थित होत्या.
 
याशिवाय रणबीरचे जवळचे मित्र अयान मुखर्जी, करण जोहरही उपस्थित होते. तर आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट, भाऊ राहुल भट्ट आणि मोठी बहीण पूजा भट्ट देखील उपस्थित होते.
 
लग्नाच्या तारखेबाबत सस्पेन्स
चित्रपट विश्वातल्या अभिनेते आणि अभिनेत्र्यांच्या लग्न तारखेबाबत नेहमीच सस्पेन्स असतो. रणवीर सिंह-दीपिका पदुकोण आणि विकी कौशल-कटरिना कैफ यांच्या लग्नावेळीही तारखेसंदर्भात सस्पेन्स पाहायला मिळाला होता.
 
काही दिवसांपूर्वी नीतू कपूर डान्स दिवाने ज्युनियर रिअलिटी डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना रणबीर-आलिया लग्नाबाबत विचारण्यात आलं. मला याविषयी माहिती नाही सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. फक्त नीतू कपूरच नव्हे तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाला याबाबत विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, लोकांनी आता ब्रेक घेतला पाहिजे. गेल्या वर्षी बॉलीवूडमध्ये दोन सुंदर जोडप्यांचं लग्न झालं आहे. आता आपण विश्रांती घ्यायला हवी, चित्रपट पाहायवा हवेत, चित्रपट करायला हवेत. बाकी गोष्टी नंतरही करता येतील.
 
रणबीर काय म्हणतो?
रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली अनेकदा जाहीरपणे दिली आहे. मात्र लग्नाच्या तारखेबाबत ते काहीही सांगत नाहीत. रणबीरला यासंदर्भभात विचारलं असता तो म्हणाला, प्रसारमाध्यमांना लग्नाची तारीख सांगायला मी वेडा नाही. आम्ही दोघे लग्नासाठी तयारी करत आहोत. लवकरच लग्न करू असं रणबीर म्हणाला होता.
 
'ब्रह्मास्त्र'पासून सुरू झालेलं प्रेम लग्नापर्यंत
चित्रपटसृष्टीत येण्याआधीच आलियाच्या मनात रणबीरविषयी प्रेम होतं. दिग्दर्शक किरण जोहर यांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात यासंदर्भात आलिया यांनी प्रेमाचा खुलासा दिला होता. स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कॉफी विथ करण कार्यक्रमात आलिया आली होती.
 
या जोडीपैकी आलियानेच पहिल्यांदा रणबीर खूप आवडत असल्याचं सांगितलं होतं. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या वेळी हे प्रेम खऱ्या अर्थाने खुललं. चित्रपटाचं शूटिंग सुरू होताच प्रेम आणखी बहरलं. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं आणि त्यामुळेच ब्रह्मास्त्राची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रणबीर-आलियाच्या या निर्णयाने फक्त प्रसारमाध्यमं नव्हे तर चाहत्यांनाही चक्रावून टाकलं आहे.
 
रणबीर आणि आलिया अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले आहेत. लग्नानंतरही ते एकत्र काम करताना दिसले तर चाहत्यांसाठी तो अनोखा अनुभव असेल. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशावरून या जोडीला चाहत्यांचं किती प्रेम मिळतं ते स्पष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती