रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

शनिवार, 8 जून 2024 (09:07 IST)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे निधन झाले ते 88 वर्षाचे होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. हैद्राबादातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.रामोजी राव यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी रामोजी फिल्मसिटी येथे ठेवण्यात येणार आहे. 
 
पीएम मोदींनीही रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'श्री रामोजी राव गरू यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली आहे. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांनी, त्यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे नवीन मानक स्थापित केले. 
 
रामोजी फिल्म सिटी हैदराबादची स्थापना 1996 मध्ये रामोजी राव यांनी केली होती, त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी झाला होता. रामोजी फिल्म सिटी हा जगातील सर्वात मोठा फिल्म शूटिंग स्टुडिओ मानला जातो. हे भारताच्या तेलंगणा राज्यात आहे. हा स्टुडिओ एकूण 1666 एकर परिसरात पसरलेला आहे.

रामोजी स्टुडिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी 15 ते 25 चित्रपटांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. येथे एकूण 50 शूटिंग फ्लोअर्स आहेत. आतापर्यंत या स्टुडिओमध्ये एकूण 25000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली' व्यतिरिक्त 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सूर्यवंश', 'दिलवाले', 'नायक', 'गोलमाल' यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंगही झाले. याशिवाय अनेक मालिकाही येथे शूट झाल्या आहेत.रामोजी राव यांचे मीडिया आणि भारतीय चित्रपट उद्योगातील योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सध्या संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती