अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या वादाच्या भोवर्यात सापडली आहे. रकुलने कास्टिंग काउचबद्दल एक वक्तव्य केले होते. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी तिच्यावर खरपूस टीका केली आहे. त्याचे झाले असे की, रकुलने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचसारखे प्रकार होत नाहीत. मात्र रकुलचे हे वक्तव्य तेलुगू अभिनेत्री श्रीरेड्डी, माधवी लता यांना पटले नाही. त्यांनी तिला खोटारडी म्हणतानाच तिच्यावर टीका केली. माधवी लताने म्हटले की, रकुल खोटं बोलत आहे. या अभिनेत्रींनी म्हटले की, रकुलच्या या अनपेक्षित वक्तव्यामागे तिचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे. तिला भीती वाटत आहे की, कास्टिंग काउचसारख्या गंभीर मुद्यावर विरोधात्मक बोलून इंडस्ट्रीत मिळणार्या भूमिकांपासून दुरावलो जाऊ नये. माधवीने म्हटले की, वास्तविक रकुलने याविषयी नव्या अभिनेत्रींमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. तिने अशाप्रकारे खोटं बोलू नये. रकुलच्या या वक्तव्याचा दोघींनी समाचार घेताना म्हटले की, टॉलिवूडमध्ये असेच लोक कास्टिंग काउचला कारणीभूत ठरत आहेत. रकुलला खरं बोलून सत्याच्या बाजूने उभे राहायला हवे. तिने असे कृत्य करणार्या निर्मात्यांचा पर्दाफाश करायला हवा. साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध नाव असलेल्या रकुलचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 मध्ये दिल्लीतील पंजाबी परिवारात झाला. 2009 मध्ये 'गिल्ली' या कन्नड चित्रपटातून तिने आपल्या अभिनयास सुरुवात केली. रकुलला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक 'यारियां'तून मिळाला. नुकतीच ती सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी स्टारर 'अय्यारी'मध्ये बघावयास मिळाली होती.