प्रखर विरोध झाल्यामुळे रजनीकांतचा श्रीलंका दौरा रद्द

राजकीय पक्षांचा विरोध झाल्यामुळे तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला श्रीलंका दौरा रद्द केला आहे. श्रीलंकेतील तमिळ नागरिकांसाठी बांधलेले घरांचे हस्तांतरण करण्यासाठी रजनीकांत हे 9 व 10 एप्रिल रोजी श्रीलंकेला जाणार होते. विडुदलै चिरूतैगल काटिच या पक्षाचे नेते तोल तिरूमावळवन यांनी या भेटीला विरोध केला होता.
 
तसेच एमडीएमके पक्षाचे नेते वैको आणि टीव्हीके पक्षाचे नेते टी. वेलगुरुगन यांनीही या भेटीला विरोध केला होता. रजनीकांत यांनी श्रीलंकेचा दौरा रद्द करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. आपण हा दौरा रद्द करत असून संबंधित कोणाही व्यक्तीने त्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे रजीनकांत यांनी प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या भेटीला विरोध करणार्‍यांचा युक्तिवाद मला पूर्णपणे पटलेला नाही, तरीही त्यांच्या विनंतीनुसार मी ही भेट पुढे ढकलत आहे. मी राजकरणी नाही, तर कलावंत आहे आणि लोकांचे मनोरंजन करणे हे माझे एकमेव कर्तव्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
 
लायका ग्रुप कंपनीच्या ज्ञानम फाउंडेशन या संस्थेने रजनीकांत यांचा दौरा आयोजित केला आहे. याच समूहाने 2.0 या चित्रपटशची निर्मिती केली आहे.
 
श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या श्रीलंकन तमिळ लोकांसाठी संस्थेने घरे बांधली आहेत. या बांधलेल्या 150 घरांचे हस्तांतरण रजनीकांत यांच्या हस्ते होणार होते.

वेबदुनिया वर वाचा