सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही यावर लवकरात लवकर सुनावणी करण्याचा विश्वास दिला होता. त्यानुसार आज या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी निर्मात्यांची बाजून सर्वोच्च न्यायालयात मांडली.
सिनेमाच्या घोषणेपासूनच करणी सेना विरोध करत आहेत. जर ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही तर सामूहिक आत्महदहन करु, अशी धमकी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तर धमकी दिली आहे. एवढंच नव्हे, सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ, असेही करणी सेनेने म्हटले आहे.’पद्मावत’ सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती. दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी ‘पद्मावत’सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.