नवाजुद्दीन सिद्दिकीनं पत्नी आलियाच्या आरोपांवर अखेर मौन सोडलं, म्हणाला

सोमवार, 6 मार्च 2023 (16:01 IST)
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोप करणारे व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. आलियाने नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात बलात्काराची तक्रारही वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केलीय.
 
हे सर्व प्रकरण गंभीर वळण घेत असताना, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनं मौन बाळगलं होतं. नवाजुद्दिननं माध्यमांशी या विषयावर बोलणं टाळलं होतं.
 
अखेर तीन पानी पत्रक सोशल मीडियावर शेअर करत, नवाजुद्दीननं या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे.
 
तत्पूर्वी, आलियाने 24 फेब्रुवारीला नवाजुद्दीनविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर इन्स्टाग्रामवर व्हीडओ शेअर करताना, काय आरोप केला, ते पाहू.
 
आलियाने काय आरोप केले आहेत?
आलिया सिद्दिकीने म्हटलं की, "एक महान कलाकार, जो महान व्यक्ती बनण्याचा कायम प्रयत्न करतो. त्याची अत्यंत निर्दयी आई, जी माझ्या मुलांना अनौरस म्हणते आणि हा माणूस गप्प राहतो. वर्सोवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार (पुराव्यांसह) दाखल केलीय. काहीही होवो, पण या वाईट हातांमध्ये माझ्या मुलांना जाऊ देणार नाही."

यानंतरही आलिया सिद्दिकीने आणखी दोन व्हीडिओ इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. त्यातील तीन दिवसांपूर्वीच्या व्हीडिओत आलिया नवाजुद्दिन सिद्दिकीच्या बंगल्याच्या बाहेर असल्याचे दिसते.
या तीन दिवसांपूर्वीच्या व्हीडिओत आलिया म्हणते की, "मी आता नवाजच्या बंगल्यातून आलीय. माझ्यासोबत माझी मुलं आहेत. माझी मुलगी रडतेय. तुम्हाला या बंगल्यात राहता येणार नाही, असं म्हणत आम्हाला बंगल्यातून बाहेर काढलंय. आता मला कळत नाहीय. माझ्याकडे 81 रुपये आहेत. ना हॉटेल आहे, ना घर आहे. मला कळत नाही, मुलांना घेऊन कुठे जाऊ, कुणाला फोन करू. नवाजला असं वागणं शोभत नाही. नवाज इतका खालच्या पातळीवर उतरलाय. त्याला कधीच माफ करू शकत नाही."
 
नवाजुद्दीन सिद्दिकीचं स्पष्टकरण
नवाजुद्दीननं अखेर स्वत:ची बाजू मांडणारं पत्रक इन्स्टाग्राम, ट्विटरसह त्याच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहेत.
 
यात नवाजुद्दीननं पाच गोष्टी सांगितल्यात, ज्यातून आलिया त्याच्याशी कशी वागतेय, हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
 
तत्पूर्वी, पत्रकाच्या सुरुवातीला नवाजुद्दीन म्हणतो की, "मी काहीच बोलत नसल्यानं मला सगळीकडे 'वाईट माणूस' असा लेबल लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मी मौन बाळगलं, कारण हा सर्व तमाशा माझी लहान मुलं वाचतील आणि त्यांना त्रास होईल."
 
तो पुढे म्हणतो की, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रसारमाध्यमं आणि काही लोकांचा गट माझ्या चारित्र्यहननाचा एकप्रकारे आनंद घेतायत. पण हे चारित्र्यहनन एकांगी आणि खोट्या गोष्टींवर व्हीडिओंवर आधारित आहे."
 
यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीने आलियाने आतापर्यंत त्याला कशाप्रकारे पैशांसाठी त्रास दिला, हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
 
याच पत्रकात नवाजुद्दीनने माहिती दिलीय की, "गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि मी सोबत राहत नाही. आम्ही घटस्फोट घेतला आहे. मात्र आमच्या मुलांसाठी आम्ही काही तडजोडी केल्या आहेत."
 
मुलांसाठी सर्व आर्थिक मदत करत असतानाही, आणखी पैशासाठी आलिया हे सर्व करत असल्याचा एकूण नवाजुद्दीन सिद्दिकीचा आरोप आहे.
 
नवाजुद्दीननं या पत्रकात म्हटलंय की, "कुणाला माहित आहे का, माझी मुलं भारतात का आहेत आणि ते गेल्या 45 दिवसांपासून शाळेत का जात नाहीत? शाळेकडून मला दररोज कळवलं जातंय की, 45 दिवसांपासून मुलं शाळेत येत नाहीत. माझ्या मुलांना गेल्या 45 दिवसांपासून ओलीस ठेवलं आहे आणि दुबईतल्या शाळेत ते जाऊ शकत नाहीत. दुसरकीडे, आलियाला गेल्या दोन महिन्यांपासून 10 लाख रुपये दिले जात आहेत."
 
याच पत्रकाच्या शेवटी नवाजुद्दीननं म्हटलंय की, "शेवटचं पण महत्त्वाचं, ते म्हणजे, कुठल्याच पालकांना असं वाटू शकत नाही की, त्यांच्या मुलांनी अभ्यास चुकवावा किंवा त्यांच्या अभ्यासावर परिणाम व्हावा. पालक त्यांच्या मुलांना हवं ते सर्व देऊ पाहतात. मी आज जे काही कमावतोय, ते सर्व माझ्या मुलांसाठी आहे आणि ते कुणीही बदलू शकत नाही. शोरा आणि यानीवर माझं प्रेम आहे आणि त्यासाठी मी कुठल्याही टोकापर्यंत जाऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करेन. न्यायव्यवस्थेवरील माझा विश्वास पुढेही कायम राहील."
 
नवाजुद्दीनच्या पत्रकानंतर आलियाने अद्याप उत्तर दिलं नाहीय. ती यावर काय म्हणते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती