फहाद फासिल : जातीय विद्वेषाच्या व्हीडिओमुळे ट्रेंड, त्याचं 'मामनन' मधलं पात्र चर्चेत का?
मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (23:02 IST)
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मामनन' या चित्रपटातील एका खलनायकाचं पात्र सध्या चर्चेत आहे. जातीय द्वेषाने प्रेरित खलनायक रत्नवेलूची चित्रपटातील सगळी दृश्यं एकत्र करून त्याला जातीय अभिमानाचं गाणं लावून ते ट्विटरवर ट्रेंड होऊ लागलंय.
29 जून रोजी मारी सेल्वराज दिग्दर्शित ‘मामनन’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यात उदयनिधी स्टॅलिन, वदिवेलू, फहाद फासिल, कीर्ती सुरेश प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाला ए. आर. रहमानने संगीत दिलंय. चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘मामनन’मध्ये अगदी वेगळ्या पद्धतीचं पात्र साकारलंय. खलनायकाची भूमिका करणाऱ्या फहाद फासिलने देखील आपली भूमिका उत्तमरित्या वठवली आहे.
विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वदिवेलू याने पहिल्यांदाच सहायक अभिनेता म्हणून काम करून सर्वांची वाहवा मिळवली.
‘मामनन’मधील फहाद फासिलने वठवलेलं रत्नवेलू हे पात्र जातीय द्वेषाने भरलेलं आहे.
जातीय अभिमानाचे व्हिडिओ
‘मामनन’च्या म्युजिक लॉन्चवेळी दिग्दर्शक मारी सेल्वराज यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ते म्हणाले होते की, वदिवेलूचं पात्र हे ‘थेवर मगन’मधील इसाकी या पात्रावरून प्रेरित आहे.
काही दिवसांपूर्वी ‘मामनन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यानंतर अनेक नेटिझन्सने फहाद फासिलने वठवलेलं रत्नवेलू या जातीय द्वेषाने भरलेल्या पात्राची चित्रपटातील सगळी दृश्य एकत्र करून त्याला जातीय अभिमानाचं गाणं लावून तो व्हिडिओ तयार केला.
काही व्हिडिओंमध्ये विशिष्ट समाजाच्या नावाचा उल्लेख करून तो व्हीडिओ व्हायरल होत आहेत.
कोण आहे फहाद फासिल ?
फहाद फासिल हा दिग्दर्शक फासिल यांचा मुलगा असून त्यांनी वर्षम 16, पूवे पूचुडा वा, कथलुक लुजमा सारखे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
फहाद फासिल हा एका मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा असला तरी चित्रपटात नाव कमावणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं.
कोणाचे तरी वारसदार आहोत म्हणून चाहते आपल्याला डोक्यावर घेत नाहीत, तर चित्रपटात अभिनय करूनच रसिकांची मनं जिंकायची असतात. यासाठी अभिनेत्याला प्रामाणिकपणे अभिनय करून चाहत्यांचं मन जिंकाव लागतं आणि ते इतकं सोपं नसतं.
मल्याळम सिनेमांच्या पलीकडेही ओळख निर्माण करणाऱ्या फहाद फासिलने जेव्हा मल्याळम सिनेमात पदार्पण केलं तेव्हा ते जबरदस्त फ्लॉप ठरलं. फहादचे वडील फासिल यांनी "कैयेत्तुम दूरथु" या चित्रपटातून त्याला ब्रेक दिला होता.
या चित्रपटावर समीक्षकांनी जोरदार टीका केली होती. फहादला त्या पराभवातून सावरता आलं नाही. यानंतर फहाद उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला.
सात वर्षांच्या अभ्यासानंतर, फहादने 2009 मध्ये ‘केरला कॅफे’ या लघुपटातून पुन्हा अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित केलं.
लहान भूमिका करायलाही न लाजणारा फहाद
‘केरला कॅफे’ या चित्रपटानंतर फहादने नायक असो वा खलनायक असो, जी काही संधी मिळाली ती घेतली. 2010 पासून त्याने अनेक दिग्दर्शकांशी संपर्क साधला.
सिनेमॅटोग्राफर शमीर ताहिर यांनी 2011 मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यांच्या 'चप्पा कुरीसू' या चित्रपटात फहादने खलनायकाची भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेचं कौतुक समीक्षकांनी तर केलंच पण प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं.
'चप्पा कुरीसू' या चित्रपटानंतर फहाद हा खऱ्या अर्थाने मोठा अभिनेता झाला असं म्हणता येईल. आशिक अबूच्या ‘22 फीमेल कोट्टाया’ आणि जोसच्या ‘डायमंड नेकलेस’ ने त्याला पुढे यायला आणखीन मदत झाली.
या दोन चित्रपटांना मिळालेलं यश फहादच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा म्हणता येईल. आत्तापर्यंत फहादने नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. पण आता तो प्रेमकथा असलेल्या चित्रपटात काम करू लागला.
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजीव रवी यांनी 'अन्न्युम रसूलम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी फहादला यात मुख्य भूमिकेत घेतलं. अनेक दिग्दर्शकांनी फहादच्या डोळ्यांचे आणि त्याने व्यक्त केलेल्या प्रेमभावनांचे कौतुक केले.
दिग्दर्शक आशिक अबू यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जेव्हा कॅमेऱ्यातून आम्ही फहादचे डोळे पाहतो तेव्हा त्याचा प्रचंड दरारा वाटतो. तसंच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मायनादी' या चित्रपटात टोविनो थॉमसऐवजी फहादने अभिनय केला असता तर चित्रपट आणखीन चांगला झाला असता, असंही त्यांनी उघडपणे म्हटलं आहे.
आणि फहाद फासिल मल्याळम सिनेसृष्टीत सुपरस्टार बनला
अभिनेता फहादने रेड वाईन, आमेन, इमॅन्युएल, आगम, 5 सुंदरी, हरम, माकेशिंदा प्रतिकारम, मलिक यांसारख्या 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मल्याळम सिनेमांव्यतिरिक्त त्याने सुपर डिलक्स, विक्रम, मामनन आणि पुष्पा सारख्या तमिळ-तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्याने पॅन इंडिया अभिनेता म्हणून नाव मिळवलंय.
सिनेमाचा विचार केला तर कोणाचा अभिनय प्रेक्षकांना खूश करेल हे सांगता येत नाही. परंतु जे अधिक वास्तववादी काम करतात त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
मॉलीवूड सिनेमाचा विचार करायचा तर चाहते खूप कमी कलाकारांना डोक्यावर घेतात, त्यांचं कौतुक करतात. अभिनेते मामूट्टी आणि मोहनलाल यांनी देखील फहादचं कौतुक केलंय.
रोमान्स असो, कॉमेडी असो, फँटसी असो, पीरियड ड्रामा असो किंवा गँगस्टर असो फहाद मल्याळम सिनेमातील एक मोठा कलाकार बनला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळख
मल्याळम दिग्दर्शक मधु. सी. नारायण यांच्या ‘कुंभलागी नाइट्स’ आणि तमिळ दिग्दर्शक कुमारा राजा यांच्या "सुपर डिलक्स" चित्रपटांनी अभिनेता फहादला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.
फहादला एक राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी केरळ सरकारचा चार वेळा पुरस्कार आणि अनेक टेलिव्हिजन पुरस्कार मिळाले आहेत.
त्याने वयाच्या 19 व्या वर्षांपासून अभिनयाला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटात मोठं अपयश मिळालेल्या फहादने आज मल्याळम चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता तमिळ, तेलगूमध्ये अभिनय करून तो राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळख मिळवू लागलाय.
हिंदी अभिनेता इरफान खानच्या मृत्यूवर फहादने एक अत्यंत हृदयस्पर्शी पत्र लिहिलं होतं.
"मी गेल्या 10 वर्षांपासून अभिनय करतोय. मी अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय असंही म्हणता येईल. मी अभिनेता इरफान खानला कधीही भेटलो नाही. तुम्ही असंही म्हणू शकता की, मी त्याला कधीच प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. मी माझ्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी त्याचा ऋणी आहे. कारण अमेरिकेत शिकत असताना डीव्हीडीवर जर मी त्याचा चित्रपट पाहिला नसता तर माझं आयुष्य बदललं नसतं आणि मी इथवर पोहोचलो नसतो. धन्यवाद सर…!"
फहादने अद्याप हिंदी चित्रपटात अभिनय का केला नाही, असं विचारल्यावर तो सांगतो, "त्याला हिंदी येत नाही आणि भाषा हे दृश्य आत्मसात करण्याचं आणि अभिनयाचं साधन आहे."
मल्याळम सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वीकारले जात नव्हते तेव्हा बदल घडवण्याची गरज व्यक्त करणाऱ्यांमध्ये फहाद देखील होता. त्याने ओटीटीवर अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यास मदत केली.