न्यायमूर्तीं विरोधात केलेल्या टिप्पणीप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. यानंतर .उच्च न्यायालयाने त्यांची आरोपातून मुक्तता केली. हे प्रकरण 2018 मध्ये न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या ट्विटशी संबंधित आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने अग्निहोत्री यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अग्निहोत्री यांनी सोमवारी न्यायालयात हजर राहून बिनशर्त माफी मागितली.
उच्च न्यायालयाने सांगितले की, विवेक अग्निहोत्री आज वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर झाले. आक्षेपार्ह ट्विटबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला असून बिनशर्त माफी.मागितली आहे. न्यायालयाचा मान दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाने म्हटले की, अग्निहोत्रीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे आपल्या वागणुकीबद्दल खेद असल्याचे दर्शवते. आपण न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि जाणूनबुजून न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे अग्निहोत्री म्हणाले.