सलमान खानबद्दलच्या 'या' 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (10:36 IST)
बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असलेल्या अभिनेता सलमान खानचा आज (27 डिसेंबर) वाढदिवस आहे.
खऱ्या आयुष्यामध्ये सलमान खानची प्रतिमा ही बरीचशी वादग्रस्त राहिली आहे. हिट अँड रन केस, काळवीट शिकार, अनेक गर्लफ्रेंड्स या गोष्टींमुळे सलमान खानच्या आयुष्यात अनेक वादंग निर्माण झाले.
दुसरीकडे त्याची पडद्यावरची प्रतिमा मात्र सोज्वळ 'प्रेम' किंवा अन्यायाला विरोध करणारा 'हिरो' (मग तो चुलबुल पांडे असो, बॉडीगार्ड असो की बजरंगी भाईजान) अशीच राहिली आहे.
सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 'रील' आणि 'रिअल' आयुष्यातील 9 इंटरेस्टिंग गोष्टी...
1. ऑन-स्क्रीन किसपासून दूर
सलमान खाननं करिअरच्या सुरुवातीपासून 'ऑन-स्क्रीन किस'ला नापसंती दर्शवली आहे.
सलमाननं त्याच्या करिअरची सुरुवात 1988 मध्ये आलेल्या 'बीबी हो तो ऐसी' या चित्रपटापासून केली होती. तेव्हापासून आपल्या 30 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यानं एकदाही पडद्यावर चुंबन दृश्य दिलं नाहीये.
याविषयी एका मुलाखतीत त्यानं म्हटलं होतं की, "मला नेहमीच खोडकर, अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट करायला आवडतात. मी नेहमीच ऑन-स्क्रीन किसिंग आणि सेक्स सीनपासून दूर राहतो. कारण, माझे फॅन्स त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझा चित्रपट पाहतात."
2. पेंटिंगची आवड
सलमान खानला पेंटिंग करायला आवडतं आणि त्याच्या पेंटिंगचे फोटो तो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
सलमान खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांनी 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यावेळी सलमाननं करिनाला एक पेंटिंग भेट दिलं होतं.
त्यानं आमीर खानला गजिनी स्टाईल पेंटिंग भेट दिलं होतं. आमीरनं सलमानच्या पेंटिंगची स्तुतीही केली होती.
3. बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड
सलमान खाननं चित्रपट क्षेत्रात बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड सुरू केला, असं म्हटलं जातं.
याविषयी अभिनेत्री करिना कपूरनं म्हटलं होतं, "सलमान खाननं सिक्स पॅक अॅब्सचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरू केला. मला वाटतं आता सगळे कलाकार बॉडी बिल्डिंगच्या मागे लागले आहेत. 6 किंवा 8 पॅक अॅब्स असावेतच, असं काही नाही. पण चित्रपट क्षेत्रात तुम्ही कसे दिसता, हे खूप महत्त्वाचं असतं."
सलमान खाननं बॉली बिल्डिंगसाठी अर्जून कपूरला मदत केल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीच्या काळात सलमान खानसोबत तो वर्क आऊट करायचा.
सलमान खानमुळेच मी बॉडी बिल्डिंगसाठी प्रेरित झालो, असं तो सांगतो. केवळ अर्जुन कपूरच नाही, तर सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन यांनाही सलमान खाननंच वर्क आऊटसाठी मदत केली होती.
4. अनेक गर्लफ्रेंड्स, पण अजूनही अविवाहित
सलमान खानच्या लग्नाविषयीच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत असतात. आतापर्यंत सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड्सही झाल्या आहेत.
अगदी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्यासोबत त्याच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, झरिन खान अशा अनेक अभिनेत्रीसोंबत त्याचं नाव जोडलं गेलं.
लग्नाविषयीच्या एका प्रश्नावर इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात त्यानं सांगितलं, "लग्न होईल, असं खूप पूर्वी वाटलं होतं, पण मी त्यातून वाचलो. आता अशी वेळ आली आहे की, मुंबई आणि जोधपूरचं प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणांत मला शिक्षा मिळाली आणि माझं लग्न झालं असतं तर? ही प्रकरणं निकाली निघाल्यानंतर लग्नाचा विचार करू."
5. बॉलिवूडमध्ये अनेकांना ब्रेक
सलमान खाननं अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला आहे. यामध्ये संगीतकार हिमेश रेशमिया, अभिनेता सूरज पांचोली, अथिया शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान, महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर...सलमाननं लाँच केलेल्या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे.
सोनाक्षी सिन्हानं 'दबंग' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
नुकत्यात प्रदर्शित झालेल्या दबंग-3 या चित्रपटाबद्दल तिनं म्हटलं होतं, "मी आज जे काही आहे, ते फक्त 'दबंग'मुळे आहे, सलमान खानमुळे आहे. त्यांनी मला रज्जो बनवलं आणि तिथून मग माझा प्रवास सुरू झाला."
असं असलं तरी, बॉलीवूडमधल्या ज्या कलाकारांसोबत सलमानचे वाद झाले आहेत, त्यांची यादीही काही कमी मोठी नाही. अगदी शाहरुख खानपासून विवेक ओबेरॉय, अरिजित सिंग, सोना मोहपात्रा अशा अनेकांचं सलमानसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बिनसलं होतं.
2003मध्ये विवेक ओबेरॉयनं एक पत्रकार परिषद घेतली होती.
त्यात त्यानं म्हटलं होतं, "सलमान मध्यरात्री दारू पिऊन आला, मला शिवीगाळ केली आणि मारायची धमकी दिली."
या पत्रकार परिषदेमुळे विवेक ओबेरॉच्या कारकिर्दीला ब्रेक लागल्याचं म्हटलं जातं. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येत होत्या, त्यादरम्यान विवेकनं हा आरोप केला होता.
6. हिट अँड रन प्रकरण
28 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप आहे. पण, सलमाननं हे आरोप फेटाळले आहेत.
6 मे 2015ला मुंबई सत्र न्यायालयानं सलमानला याप्रकरणी 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. याच दिवशी संध्याकाळी हायकोर्टानं त्याला दोन दिवसांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर 8 मेला हायकोर्टानं सलमानच्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
7. काळवीट शिकार प्रकरण
चित्रपट 'हम साथ साथ है'च्या चित्रिकरणादरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर 1998 कालावधीत सलमानसह इतर कलाकारांवरही आरोप होते. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर काळवीटच्या शिकारीसाठी सलमानला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. मथानिया आणि भवाद या ठिकाणी काळविटांच्या शिकाराची दोन स्वतंत्र प्रकरणं, कांकाणीमध्ये हरणांची शिकार प्रकरण आणि लायसन्स संपल्यानंतरही रायफल बाळगल्याचा (आर्म्स अॅक्ट) आरोप सलमानवर आहे.
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयानं 2018 मध्ये सलमान खानला दोषी ठरवलं होतं.
त्याला 5 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. नंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमानला सोडण्यात आलं.
8. बीईंग ह्यूमनच्या माध्यमातून समाजकार्य
सलमान खाननं 2007मध्ये 'बीईंग ह्यूमन' नावाची संस्था सुरू केली. त्या माध्यमातून तो तळागाळातल्या लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यसुविधा पुरवण्याचं काम करतोय, असं या संस्थेच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
तसंच 2013 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळात मदतीचं काम केल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे.
2013मध्ये 'बीईंग ह्यूमन' संस्थेनं राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये 2000 लीटर क्षमता असलेल्या 2500 पाण्याच्या टँकचं वाटप केलं होतं.
असं असलं तरी, सलमाननं त्याच्या या सामाजिक कामाचा वापर त्याच्याविरोधातील गुन्ह्याच्या खटल्यांमधून बाहेर पडण्यासाठी केला, असा आरोपही करण्यात आला आहे.
9. वडिलांची साथ
'जेव्हा-केव्हा मी चुकलो, तेव्हा माझ्या वडिलांनी (सलीम खान) मला समजावून सांगितलं. ते माझे सगळ्यात मोठे टीकाकार आहेत आणि मला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची असते, कारण ते प्रामाणिक आहेत, असं सलमाननं एकदा म्हटलं होतं.
1993मधील मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या समर्थनाथ ट्वीट केल्यानंतर सलमान खानवर प्रचंड टीका झाली होती.
सलमानचं ट्वीट म्हणजे मूर्खपणा आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही. सलमाननं त्याच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायला हवं, असं ट्वीट सलीम खान यांनी केलं होतं. यानंतर सलमाननं माफी मागत यावर स्पष्टीकरण दिलं होतं.