Bollywood : स्री-पुरूष भेदभाव 70 वर्षांत कमी झाला आहे का?

शुक्रवार, 11 जून 2021 (11:04 IST)
- गीता पांडे
देशातील बॉलीवूड इंडस्ट्री म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील भेदभाव गेल्या 70 वर्षांत कमी झाला आहे का? बॉलीवूड गेल्या 70 वर्षांत पुरोगामी बनू शकलं का?
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे गेल्या 70 वर्षांत चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेल्या डायलॉग्जचा अभ्यास करून याचं उत्तर मिळालं आहे. - हो सुद्धा आणि नाही सुद्धा.
 
2.1 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो चित्रपट बनतात. जगभरातील कित्येक देशांमध्ये हिंदी चित्रपट आवडीने पाहिले जातात.
 
बॉलीवूड कलाकारांचा चाहता वर्गही मोठा आहे. ते त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या नावाने रक्तदान शिबीरं आयोजित केली जातात. काही ठिकाणी तर अभिनेत्यांच्या नावाने मंदिरंही बनवण्यात आलेली आहेत.
 
मात्र गेल्या काही वर्षांत बॉलीवूडवर मोठ्या प्रमाणात टीकाही झालेली आहे. चित्रपटात दाखवले जाणारे प्रतिगामी विचार, महिला विरोधी भावना, रंगभेद आणि महिलांविरोधात केला जाणारा भेदभाव या कारणामुळे बॉलीवूडला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
 
पण सामाजिक भेदभावाचा विचार करता चित्रपट इंटस्ट्रीची वाटचाल कशी राहिली, याबाबत कोणताही अभ्यास झालेला नव्हता.
 
अमेरिकेच्या कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटीतील कुणाल खाडीलकर आणि आशिकुर खुदाबख्श यांना या विषयावर संशोधन करायचं आहे.
 
यासाठी त्यांनी 1950 ते 2020 दरम्यानच्या 7 दशकांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा अभ्यास करण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक दशकात हिट मानल्या गेलेल्या प्रत्येकी शंभर म्हणजेच एकूण 700 चित्रपटांची त्यांनी यासाठी निवड केली.
 
खाडीलकर आणि खुदाबख्श यांच्या मते, ते स्वतः मोठे बॉलीवूड चाहते आहेत. त्यांनी या चित्रपटांचे सबटायटल्स एका ऑटोमेटेड लँग्वेज सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केले आहेत.
 
त्या मार्फत गेल्या 70 वर्षांत बॉलीवूडमध्ये वापरण्यात येणारी भाषा कशा प्रकारे बदलत गेली, याचा त्यांना अभ्यास करावयाचा आहे.
 
खुदाबख्श यांनी पेन्सिल्वेनियाच्या पीटर्सबर्ग येथून बीबीसीशी संवाद साधला.
 
ते म्हणतात, "चित्रपट समाजात दिसणारा भेदभाव दाखवणारा आरसा असतात. आपल्या आयुष्यावर चित्रपटांचा खूप मोठा प्रभाव पडतो. गेल्या 70 वर्षांत भारताची स्थिती किती बदलली, हे मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून अभ्यासण्याचा आमचा प्रयत्न आहे."
 
इतर देशांच्या फिल्म इंडस्ट्रींच्या तुलनेत बॉलीवूड समजून घेण्यासाठी खाडीलकर आणि खुदाबख्श यांनी भारतीय चित्रपटांसोबतच हॉलीवूडचे 700 चित्रपट आणि ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यात परदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळालेल्या आणि समीक्षकांकडून कौतुक झालेल्या 200 चित्रपटांचाही आपल्या अभ्यासात समावेश केला.
 
या अभ्यासाच्या निष्कर्षातून अत्यंत आश्चर्यजनक माहिती समोर आल्याचं ते सांगतात.
 
बॉलीवूडमध्ये तर भेदभाव आहेच, शिवाय हॉलीवूडमध्येही काही प्रमाणात भेदभाव होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
 
मात्र दोन्ही चित्रपटसृष्टींमधील सामाजिक भेदभाव हळू-हळू कमी होत गेल्याचं त्यांना आढळून आलं.
 
खाडीलकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "गेल्या 70 वर्षांत आपण बरेच पुढे निघून आलो आहोत. मात्र या दिशेने आपल्याला आणखी पुढे जायचं आहे."
 
'सौंदर्य म्हणजे गोरेपणा नव्हे'
कुटुंबात मुलांना प्राधान्य देण्याची विचारसरणी आणि हुंडापद्धत यांसारख्या कुप्रथांच्या संदर्भात बॉलीवूडमध्ये बदल घडला आहे का, हासुद्धा संशोधकांचा एक प्रश्न होता. यामध्ये बरीच सुधारणा त्यांना आढळून आली.
 
खुदाबख्श सांगतात, "1950 ते 60 दरम्यान चित्रपटांमध्ये जन्मणारी 74 टक्के अपत्ये पुरुष जातीची होती. 2000 सालापर्यंत हा आकडा 54 टक्क्यांपर्यंत खाली आला. हे अंतर मोठं आहे."
 
ते सांगतात, "भारतात पुरुष जातीचं बाळ होण्याची, हुंडा मिळण्याची अपेक्षा जास्त आहे. हुंडा प्रथा 1961 साली एक कायदा बनवून रद्द करण्यात आली. पण तरीही भारतात प्रत्येकी 10 लग्नांपैकी 9 लग्न अरेंज्ड मॅरेज स्वरुपात होतात. शिवाय, वधू पक्षाने रोख रक्कम, दागिने, भेटवस्तूंच्या स्वरुपात वरपक्षाला हुंडा द्यावा, अशी मागणी केली जाते. हुंडापद्धतीमुळे भारतात मोठ्या संख्येने विवाहित महिलांची हत्या होते."
 
खुदाबख्श पुढे सांगतात, "आम्ही आकडेवारी पाहिली. त्यामध्ये जुन्या चित्रपटांमध्ये हुंड्यासोबतच पैसे, कर्ज, दागिने, फी, उधार यांसारख्या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. हे सगळे शब्द हुंडाप्रथेशी संबंधित आहेत. पण आधुनिक चित्रपटांमध्ये हिंमत, नकार यांसारख्या शब्दांचा वापर जास्त झाला. तसंच या चित्रपटांमध्ये हुंडाप्रथेचं पालन न करण्याच्या संदर्भाने 'घटस्फोट' आणि 'समस्या' या शब्दांचा वापर होताना दिसला."
 
पण त्याचसोबत काही भेदभाव बदलले नाहीत, असंही अभ्यासात समोर आलं. गोऱ्या रंगाकडे असलेला कल आणि त्याबाबतचे जुने पूर्वग्रह बदलले नाहीत. बॉलीवूडसाठी सौंदर्याचा अर्थ गोरेपणाच असल्याचं त्यांना आढळून आलं.
 
खाडीलकर यांनी याबाबत एक अभ्यास केला होता. त्यामध्ये एका सुंदर महिलेचा रंग गोरा असायला हवा, असं उत्तर बॉलीवूड चित्रपटांमध्ये मिळालं. हॉलीवूडमध्येही अशाच प्रकारचे निष्कर्ष आले. पण त्यांचं प्रमाण कमी होतं.
 
जुन्या विचारांना तिलांजली कधी?
बॉलीवूडमध्ये जातींबाबतही एक प्रकारचा भेदभाव असल्याचं अभ्यासात आढळून आलं. यानुसार, चित्रपटांतील बहुतांश डॉक्टर उच्च जातीचे हिंदू असतात. पण बदलत्या काळानुसार इतर धर्मांच्या व्यक्तींनाही या भूमिकेत दाखवण्यात आलं. पण देशातील अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना या भूमिकेत फारच कमी वेळा दाखवण्यात आलं.
 
चित्रपट समीक्षक आणि 'फिफ्टी फिल्म्स दॅट चेंज्ड' बॉलीवूड या पुस्तकाच्या लेखिका शुभ्रा गुप्ता यांच्याशीही बीबीसीने संवाद साधला.
 
त्या सांगतात, "बहुतांश चित्रपट निर्माते उच्च जाती, उच्च वर्ग आणि प्रभावी धर्माला आपले दर्शक या स्वरुपात पाहतात. त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिकेत ते याच वर्गातील लोकांना पाहतात."
 
शुभ्रा गुप्ता या इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात नियमितपणे स्तंभलेखन करत असतात. त्या प्रतिगामी विचार, महिला विरोधी भावना आणि पुरुषसत्ताक चित्रपट यांच्याबद्दल सातत्याने लिहित असतात.
 
त्या पुढे सांगतात, "बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चित्रपटात त्यांच्या भूमिकांची नावे पाहिल्यास ती बहुतांश वेळा हिंदू असल्याचं दिसून येतं. चित्रपटांमध्ये मुस्लीम व्यक्ती कमीच पाहायला मिळतात. दिसले तरी ते परंपरावादी विचारसरणीने भरलेल्या भूमिकांमध्ये जास्त असतात."
 
भारतात चित्रपट पाहायला जाणारे प्रेक्षक त्यामध्ये मुख्यत्वे धक्कादायक दृश्य, नाचगाणी पाहण्यासाठीच जातात. त्यामुळे निर्मातेही त्याच गोष्टींचा विचार करून चित्रपट बनवतात.
 
ठराविक काळात तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारे चित्रपटही प्रदर्शित होतात. पण त्या तुलनेत जुन्या विचारांवर आधारीत असलेले इतर 10 चित्रपट रांगेत उभी असतात.
 
शुभ्रा गुप्ता सांगतात, "बॉलीवूड चित्रपटसृष्टी जोखीम घेण्यास घाबरते. लोकांना आवडत असलेले चित्रपटच आपण बनवत असल्याचं निर्मात्यांचं मत आहे. चाहत्यांनी पाठ फिरवल्यास आपल्या उत्पन्नावर परिणाम होईल, ही भीती त्यांना असते."
 
त्या पुढे सांगतात, "कोरोना संकटाच्या काळात OTT प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होत असलेले चित्रपट आणि वेब सिरीज पाहिल्यास बदल आणणं अवघड नाही, असं आपल्याला म्हणता येईल.
 
पारंपारिक रुढींपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहण्यास प्रेक्षक आता तयार आहेत, हे कोरोना संकटाने दाखवन दिलं आहे. आता दर्शकांकडे शक्ती आहे. ते वेगळ्या पद्धतीचा कंटेंट मागत असतील तर निर्मात्यांनाही चांगल्या पद्धतीचे चित्रपट बनवावे लागतील. त्यानंतर बॉलीवूडला बदलावंच लागेल, हे नक्की."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती