BiggBoss15 ची मराठमोळी विजेती तेजस्वी 9 वर्षांच्या मुलासोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे होती चर्चेत

सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:45 IST)
तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिग बॉस 15 विजेती होण्याचा मान पटकावला. सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खानने रविवारी (30 जानेवारी) रात्री रंगलेल्या सोहळ्यात यासंदर्भात घोषणा केली. प्रतीक सहजपाल उपविजेता ठरला.
 
तेजस्वीला ट्रॉफीसह 40 लाख रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात आलं. बिग बॉस15 हंगामाच्या शेवटच्या भागात तेजस्वीसह प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हेही जेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र तेजस्वीने सगळ्यांना मागे टाकत बाजी मारली.
 
तेजस्वीचे बाबा अर्थात प्रकाश वायंगणकर गायक आहेत आणि ते दुबईला असतात. रविवारी रात्री रंगलेल्या सोहळ्यादरम्यान विजेता कोण ठरणार याविषयी उत्सुकता होती. ट्वविटरवर तेजस्वीकरता चाहत्यांनी हॅशटॅगसह ट्वीटही केले होते.
 
चार महिन्यांच्या बिग बॉसमधील वास्तवादरम्यान तेजस्वी आणि शमिता शेट्टी यांच्यात भांडणही झालं होतं. करण कुंद्रावरून या दोघींमध्ये वाद झाला होता.
 
तेजस्वीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयात इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असलं तरी तेजस्वीला अभिनेत्री व्हायचं होतं.
'संस्कार-धरोहर अपनों की' या मालिकेद्वारे तेजस्वीने पदार्पण केलं. 'स्वरांगिणी- जोडे रिश्तों के सूर' या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. रागिणी लक्ष्य महेश्वरी हे तेजस्वीने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं होतं.
 
तेजस्वी 'किचन चॅम्पियन5' नावाच्या रिअलटी शो मध्ये सहभागी झाली होती. 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10' या स्पर्धेत तेजस्वी सहभागी झाली होती. अंडरवॉटर स्टंट करताना तिच्या डोळ्याला दुखापतही झाली होती.
 
'खतरों के' खिलाडी शो दरम्यान तेजस्वी आणि शिवीन नारंग या जोडीचीही चर्चा रंगली होती. #tevin असा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. शिवीन माझा अतिशय चांगला मित्र आहे. त्यापेक्षा काहीही नाही असं सांगत तेजस्वीने सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला होता.
 
'सिलसिला बदलते रिश्तों का' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या मालिकेतही तिने काम केलं होतं. म्युझिक व्हीडिओमध्येही तेजस्वी दिसली होती.
 
2017 मध्ये तेजस्वी प्रमुख भूमिकेत असलेला 'पहरेदार पिया' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मालिकेच्या कथानकानुसार, तेजस्वी साकारत असलेलं पात्र एका लहान मुलाशी लग्न करतं. तो मुलगा फक्त 9 वर्षांचा दाखवण्यात आला होता.
 
कथानक स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर मालिकेवर जोरदार टीका करण्यात आली. काहींनी यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला. बालविवाहाला प्रोत्साहन देत असल्याप्रकरणी मालिकेविरोधात ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली होती.
सीरियलच्या चाहत्यांनी मालिका सुरू राहावी यासाठी 13 हजार प्रेक्षकांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं. समाजातील वास्तवच दाखवत आहोत अशी भूमिका निर्मात्यांनी घेतली. यानंतरही मालिका सुरू राहिली.
 
टीकेचा सूर आणखी तीव्र झाल्यानंतर मालिका बंद करण्यात आली. मात्र यासाठी प्रसारणाची मिळालेली वेळ हे कारण देण्यात आलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती