बादशाह : ‘मला भयंकर नैराश्य होतं आणि पहिल्यांदा पॅनिक अटॅक आला तेव्हा...’

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (15:02 IST)
तुम्ही जर क्लबमध्ये उडत्या गाण्यांवर थिरकर असाल तर यात गाण्यात बादशाहची गाणी असण्याची शक्यता खूपच जास्त आहे.गेल्या एका दशकापासून रॅपर बादशाह याने भारतीय संगीत उद्योगात आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्याची अनेक गाणी गाजली आणि आजही वाजतात जसं की – ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, ‘काला चश्मा’.
 
अशी गाणी देणारा आणि ‘इट्स युअर बॉय बादशाह’ म्हणणारा बादशाह प्रत्येक पार्टीचा केंद्रबिंदू असेल असं तुम्हाला वाटत असेल पण तो म्हणतो की असं सहसा होत नाही.
 
बीबीसी एशिया नेटवर्कशी बोलताना तो म्हणतो, “मी कधीच कोणत्या पार्टीचं आकर्षण नसतो. तुम्ही मला कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातच पाहाल. खूप लोक माझ्यावर प्रेम करतात हे खरं आहे, मला हे आवडतंही पण प्रसिद्धीमुळे मी थोडा संकोचतो.”
 
37 वर्षीय बादशाह ब्रिटनच्या अधिकृत म्युझिक चार्टमध्ये अनेकदा प्रथमस्थानी होता. आता त्याने आपला लंडन दौरा सुरू केला आहे, त्यानिमित्ताने बीबीसीने त्याच्याशी बातचीत केली.
 
‘मला नैराश्याने घेरलं होतं’
बादशाह आता अनेक जाहिराती, सोशल मीडिया कँपेनमध्ये झळकतो आणि टीव्ही शो होस्ट करतानाही दिसतो.
 
पण इथपर्यंत पोचणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. तो म्हणतो, “मी दीर्घकाळ मानसिक रोगांशी झगडत होतो. कधी कधी वाटतं मी फार आधीच तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी होती. थेरेपी फार महत्त्वाची आहे आणि तुम्हाला हे वाटायला हवं की आता सगळं काही ठीक होईल.”
 
बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया आहे. तो म्हणतो, “मला भयंकर नैराश्य आणि अस्वस्थतेने घेरलं होतं. मला उपचारांची गरज होती.”
 
भारतासारख्या देशात मानसिक स्वास्थ्याबद्दल चर्चा करणं आजही सोपं नाही. पण बादशाहाला वाटतं की हातावर प्लॅस्टर घालणं जितकं सोपं आहे तितकंच मानसिन आजारांवर उपचार करणं सोपं असावं.
 
“काहीतरी बिनसलंय हे मान्य करण्याची ताकद हवी. आणि बिनसलं असेल तर त्यावर उपचार हवेत. यात न मान्य करण्यासारखं किंवा न बोलण्यासारखं काहीच नाही.”
 
पहिल्यांदा पॅनिक अॅटॅक आला तेव्हा...
बादशाह म्हणतो की संगीतातून त्याला स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्याची संधी मिळते.
 
तो 2014 चा एक किस्सा सांगतो जेव्हा त्याला लंडनहून भारतात परत येणाऱ्या फ्लाईटमध्ये पॅनिक अॅटॅक आला होता.
 
तो म्हणतो, “मला वाटलं की मला हार्ट अॅटॅक आलाय. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी माझा फोन काढला आणि माझ्या मनात जे येतं ते लिहायला सुरुवात केली. पुढच्या 15 मिनिटात मला एकदम बरं वाटलं. तेव्हा मला कळलं की ही संगीताची ताकद आहे.”
 
तो पुढे म्हणतो, “माझ्यावर जेव्हाही अशी वेळ पुन्हा येते, तेव्हा मी फक्त लिहितो. मला बरं वाटतं.”
बादशाह भले पार्टीवाल्या गाण्यासांठी प्रसिद्ध असेल पण त्याच्या 2020 साली आलेला अल्बम ‘द पावर ऑफ ड्रीम्स ऑफ अ किड’ मधल्या ‘फोकस’ आणि ‘घर से दूर’ ही गाणी त्याला जास्त जवळची आहेत.
 
तो म्हणतो, “मी खुलेपणाने या गाण्यात भावना व्यक्त केल्या आहेत.”
 
हा खुलेपणाच त्याला त्याच्या चाहत्यांशी बांधून ठेवतो असं तो म्हणतो.
 
तो म्हणतो, “जिथे मी सैतानाचा उल्लेख करतो, तेव्हा मला खूप असुरक्षित वाटत असतं. मला वाटतं की लोकांना हे कळावं.”
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबदद्ल काय वाटतं?
 
भारत जगातली सर्वांत मोठी लोकशाही आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कथितरित्या बंधन असल्याच्या कारणावरून भारतावर टीका होत असते. अनेक प्रसिद्ध व्यक्ती वादग्रस्त मुद्द्यांवर आपलं मत मांडल्यामुळे लक्ष्य झाल्या आहेत.
 
बादशाह म्हणतो, “तुमच्या शब्दांची व्याख्या अनेक प्रकारे केली जाऊ शकते हे समजणं फार आवश्यक आहे. एक कलाकार म्हणून कधी तुमच्या लक्षात येत नाही पण तुमच्यावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव असतात. शेवटी तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात त्यामुळे तुम्हाला अनेक बाबी ध्यानात ठेवाव्या लागतात.”
 
त्याच्या म्हणणं आहे की त्याचा सगळ्यांत प्रमुख उद्देश ‘मनोरंजन’ करणं आहे. त्यानंतर ज्या गोष्टी त्याला महत्त्वाच्या वाटतात त्यावर काम करणं. उदाहरणार्थ लहान मुलांचं शिक्षण आणि हवामानबदल.
 
तो म्हणतो, “हे चांगलं काम आहे. जर यात मी यशस्वी झालो तर मला आनंद होईल.”
 
भारतात बादशाहचे अनेक चाहते आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला ओळख आहे त्यामुळे त्याला धकाधकीचं आयुष्य जगावं लागतं.
 
रोजच्या धावपळीतून तो स्वतःसाठी वेळ कसा काढतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बादशाह म्हणतो,
 
“मी माझ्या आईवडिलांसोबत हिमालयात जातो. शांत संगीत ऐकतो. माझ्यासाठी हा आनंद फार मोठा आहे. मला यासाठी फक्त एक आठवडा द्या आणि त्याबदल्यात माझ्याकडून एक वर्षं घ्या.”
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती