Aryan Khan: आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (09:11 IST)
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी कोर्टानं 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी सुनावली आहे.अरबाज आणि मुनमुन यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत NCB च्या कोठडीत राहावं लागणार आहे.
"आरोपीच्या फोन चॅटमध्ये कोड नावं आहेत. याची चौकशी करायची आहे. सत्य शोधण्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे. आज आम्ही एका आरोपीला अटक केलीय. हे लोक एका ग्रुपमध्ये काम करतात. ड्रग्जचं सिंडिकेट शोधायचंय. ही एक गँग आहे, एकाकडून दुसऱ्याकडे जातात," असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.
तर आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं की, "आर्यनच्या बॅगमध्ये काहीही मिळालं नाहीय. एनसीबीने त्याचा फोन घेतला. अरबाज मर्चंट हा आर्यनचा मित्र आहे. त्याच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळाला. इतर आरोपींकडे ड्रग्ज मिळालं. त्या आरोपींना आर्यन ओळखत नाही. त्याचा त्यांच्याशी संबंध नाही."इतर आरोपींकडून मिळालेल्या ड्रग्जवरून आर्यनची कोठडी मागत असल्याचं वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.
आर्यन खानची कालची रात्र NCB कोठडीत
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
आर्यन खान बरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही रविवारी (3 ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आलं.
पुढील चौकशीसाठी दोन दिवसांच्या NCB कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची कोठडी दिली.आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली.
आरोपी आणि ड्रग्सच्या रॅकेटमधील संबंध शोधण्यासाठी कस्टडी हवी आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.आर्यन खानच्या बॅगमध्ये तसेच फोनमध्ये काहीच सापडलं नाही तेव्हा आर्यन खानला जामिन देण्यात यावा अशी मागणी आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदेंनी केली. त्यांनी न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती.
नुपूर सतिजा, इश्मित सिंह चढ्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनाही सोमवारी (4 ऑक्टोबर) कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, दरम्यान, आर्यनवरील कारवाईनंतर रविवारी (3 ऑक्टोबर रात्री उशीरा अभिनेता सलमान खान हा शाहरूखची भेट घेण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचला.
सलमानची गाडी पाहिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला, मात्र सलमान कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आतमध्ये गेला.
काय झालं होतं?
मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली तसेच त्याची जे. जे. मेडिकल महाविद्यालयात चाचणी करण्यात आली आहे.
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री धाड टाकली होती. या प्रकरण आर्यन खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती NCB मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.
आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावे आहेत, असं विभागाने सांगितलं.या सर्वांचा संबंध मुंबईतील क्रूझवर होत असलेल्या कथित रेव्ह पार्टीशी आहे. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल, असं मत NCB प्रमुख एस. एन. प्रधान यांनी नोंदवलं आहे."आम्ही या प्रकरणात अतिशय निःपक्षपातीपणे काम करत आहोत. या प्रकरणात बॉलीवूड अथवा धनाढ्य लोकांचाही संबंध असल्याची माहिती मिळतेय, पण तरीही आमचं काम आम्ही निःपक्षपातीपणे करू. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला कामाची अंमलबजावणी करावी लागेल," असं प्रधान म्हणाले.
मध्यरात्री केली कारवाई
मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत 10 जणांना एनसीबीनं ताब्यात घेतल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली होती.
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
NCB ने मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टीवर केलेल्या कारवाईवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही प्रतिक्रिया दिली.
गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्ज कारवाईचे पुढे काय झाले? या छोट्या कारवाया त्या घटनेवर पडदा टाकण्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.