तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला अटक, अभिनेत्रीच्या आईने केली तक्रार
रविवार, 25 डिसेंबर 2022 (10:04 IST)
सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा सहकारी आणि अभिनेता शिझान खानला अटक केली आहे. तुनिशा शर्मा सध्या सोनी सब टीव्हीवरील 'अलिबाबा : दास्तान ए काबुल' नामक मालिकेत मुख्य भूमिका करत होती.
मालिकेचं चित्रिकरण वसईत सुरू असताना, मेकअप रूममध्ये तुनिशानं आत्महत्येचं पाऊल उचललं. तुनिशा बराच वेळ मेकअप रूमच्या बाहेर न आल्यानं इतर सहकाऱ्यानं मेकअप रूमच्या दिशेनं धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, अभिनेता शिझान खान याने तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं तुनिशाच्या आईनं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पोलीस अधीक्षक चंद्रकांत जाधव यांनी याविषयी बोलताना सांगितलं, “तुनिशा शर्मा ही अलीबाबा नावाच्या मालिकेत काम करत होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तुनिशा शर्मानं आत्महत्या केलेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आहे.
“तिच्यासोबत काम करणाऱ्या शिझान सोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि यातल्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचलल्याचं तुनिशाच्या आईचं म्हणणं आहे. तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. शिझानला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,” असंही जाधव यांनी सांगितलं.
“तुनिशा गरोदर असल्याचं सध्या तरी समोर आलेलं नाही, पोलीस पुढची चौकशी करत आहेत,” असंही जाधव यांनी पुढे स्पष्ट केलं.
एएनआयनं वृत्त दिलंय की, वाळीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तुनिशाचा सहकलाकार शिझान खानला अटक केली आहे.
पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला. आज शिझानला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
शिझान खान कोण आहे?
शिझान खान हा टीव्ही मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे. त्याला इन्स्टाग्रामवर 2 लाख 16 हजार फॉलोअर्स आहेत.
गेल्या काही दिवसांत त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर अलीबाबा या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत.
यात त्यानं तुनिशासोबत लडाख आणि इतर ठिकाणच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटोही शेयर केले आहेत.
तुनिशानं शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलंय...
अभिनेत्री तुनिशा शर्मानं आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक वाक्यही लिहिलं आहे.
या फोटोत तुनिशाच्या हातात कुठलेतरी दिसत आहे. तिने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की - "स्वत:च्या जिद्दीनं काम करणारे कधीच थांबत नाहीत..."
तुनिशाचा अल्पपरिचय
तुनिशा शर्मा 20 वर्षांची होती. तुनिशा शर्मा हिंदी टीव्ही मालिका आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करत असे.
2016 साली प्रदर्शित झालेल्या 'फितूर' सिनेमातून तुनिशानं या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अभिनेत्री विद्या बालनसोबत तुनिशानं 'कहानी 2' सिनेमातही काम केलं होतं.
टीव्ही मालिकांमध्ये तर ती एव्हाना नावाजलेला चेहरा बनली होती.
इंटरनेटवाला लव्ह, इश्क सुबाल्लाह, गायब आणि शेर-ए-पंजाब : महाराजा रणजित सिंह यांसारख्या मालिकांमध्ये तुनिशानं काम केलं होतं.
'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या मालिकेतही तुनिशानं काम केलं होतं.